ठाणे – इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना मराठी विषयाचे उत्तम शिक्षण मिळाले तर, इंग्रजी माध्यमात मुले शिकत आहेत, याची काळजी आपल्याला राहणार नाही, असे मत न्यायमूर्ती अभय ओक यांनी मांडले. ज.ए.इ चे मोह विद्यालय, रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे आणि अभिरुची मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी आणि माजी न्यायमूर्ती अभय ओक हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

सर्वोच्च न्यायालयात मी स्वतः आणि माझे ज्येष्ठ सहकारी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई आम्हा दोघांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. मराठी माध्यमातून शिक्षण झाले म्हणजे न्यूनगंड बाळगायची गरज नाही. मला अनेकजण विचारतात की, मुंबई आणि कर्नाटक उच्च न्यायालय असो वा सर्वोच्च न्यायालय याठिकाणी काम करताना इंग्रजीतून परिपत्र लिहावी लागतात. तर, तुम्हाला कधी भाषेची अडचण आली का, तेव्हा मी प्रत्येकाला सांगतो की, माझ्या शाळेने मला अतिशय चांगले असे इंग्रजी भाषेचे शिक्षण दिले. शाळेत असताना शिक्षकांनी आमचे इंग्रजी व्याकरण खूप पक्के करुन घेतले आहे. आज इंग्रजी माध्यमाचा पगडा निर्माण झाला आहे, असे म्हटले जाते. सगळी मुले इंग्रजी माध्यमाकडे धाव घेतात. खरंतर ही काळाची गरज आहे. परंतू, जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मुल शिक्षण घेत असली तरी, या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मराठी मुलांना मराठी भाषेचे अतिशय चांगले शिक्षण दिले पाहिजे, असे माजी न्यायमूर्ती अभय ओक म्हणाले.

मला अनेकजण विचारतात, तुमच्यात वेळ पाळण्याची शिस्त कुठून आली. त्यावेळी मी त्यांना सांगतो शिस्त आम्हाला शाळेतील परांजपे सरांनी लावली. कारण एक मिनिट जरी शाळेला उशिर झाला तरी, आम्हाला शाळेत छड्या खाव्या लागत होत्या. त्यामुळे उशिर होण हे किती चुकीच आहे किंवा उशिर झाला तर, त्याचे काय गंभीर परिणाम होतात हे मनामध्ये कायम घर करुन राहिले. त्यामुळे वेळेची शिस्त मी पूर्णपणे मोह विद्यालयातून शिकलो. परंतू, आता या शिस्तीच्या नियमात खूप बदल झालेले दिसतात. त्यावेळी आम्हाला शिक्षकांनी शिक्षा केली तर, वाईट वाटायचे. त्यापेक्षा ही गोष्ट घरी समजली तर, त्याची भिती वाटायची. आजची परिस्थीती अशी झालेय की, एखाद्या मुलाला शिक्षा केली तर, पालक शाळेत येऊन शिक्षकांना जाब विचारतात. पण, विद्यार्थ्यांना शिस्त लावायची नाही हे मला वैयक्तिकरित्या अनाकलनीय वाटते, असे मत अभय ओक यांनी मांडले.
शिक्षण संस्थांमध्ये हे बदल होणे गरजेचे आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणून घटनेत जी तत्त्वे दिलेली आहेत. ते आताच्या पिढीला समजणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व शिक्षण संस्थांच्या शाळेत आयोजित केल्या जात असलेल्या कार्यक्रमात घटनेतील प्रस्तावनेचा उल्लेख केला पाहिजे. त्या प्रस्तावनेत घटनेचे सार आहे, नागरिकांची कर्तव्य आणि हक्क काय आहे, याचा उल्लेख आहेत. तर, आधुनिक शिक्षणाचा काळ असला तरी, आजही अनेक संस्थांच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने होत असते. त्यामागे धार्मिक भावना आहे. परंतू, जर कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाडांना पाणी घालून केली पाहिजे. ही संकल्पना आपल्या घटनेशी सुसंगत आहे, असे मत अभय ओक यांनी मांडले.