ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई आणि ठाणे शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाते. परंतु फेरफटका, पार्ट्यांसाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांकडून कचरा टाकला जातो. या कचऱ्यामुळे परिसंस्थेला धोका निर्माण होतो. त्यामुळे येऊर एनव्हायर्नमेंटल सोसायटी या संस्थेने पर्यावरणपूरक उपक्रम ‘ग्रीन गटारी’ साजरा करत शेकडो किलो कचरा जंगलातून बाहेर काढला. या मोहीमेत विविध महाविद्यालय, शाळांमधील विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जैवविविधता आहे. या जंगलात दुर्मिळ वृक्ष, प्राणी-पक्षी आढळून येतात. परंतु बेकायदेशीररित्या जंगलात प्रवेश करुन मद्यपींकडून जंगलामध्ये पार्ट्या केल्या जातात. पार्ट्या केल्यानंतर निर्माण होणारा कचरा जंगलामध्येच टाकला जात होता. त्यामुळे मद्यपींच्या प्रवेशाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी २०१५ मध्ये ‘ग्रीन गटारी’ची सुरुवात झाली होती. यावर्षी ग्रीन गटारीच्या ११ वा वर्धापनदिन होता. त्यानिमित्ताने १९ जुलैला बोरीवली येथे तर २१ जुलैला येऊरच्या जंगलात विविध प्रशासकीय संस्था व महाविद्यालये यांच्या मदतीने ग्रीन गटारी मोहीम आखण्यात आली.
या वर्षी वनभ्रमंतीनंतर येऊर येथील प्रमुख भेंडीनाला येथे सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील ५० विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. ठाणे महापालिका, वन विभागाच्या सहकाऱ्याने ही मोहीम पार पडली. तर बोरीवली येथे फॉर फ्युचर फाउंडेशन, गो ग्रीन्स फाउंडेशनमधील स्वयंसेवी आणि पाटकर महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.
२०१५ मध्ये जेव्हा आम्ही ‘ग्रीन गटारी’ची सुरुवात केली, तेव्हा हजारो पर्यटक मद्यपान तसेच पार्ट्या करायला जंगलात अपप्रवेश करत होते. या पर्यटकांमुळे येऊरच्या जंगलाला होणारे नुकसान तसेच वन्यप्राण्यांना होणाऱ्या इजा पाहून मन व्यथित व्हायचे. याला प्रतिबंध घालण्यासाठी निसर्गप्रेमींच्या माध्यमातून वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, रानभाज्या महोत्सव असे उपक्रम सुरु केले. तसेच नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक जन-आधारित पर्यावरणवादी चळवळ विकसित केली असे येऊर एनव्हायर्नमेंटल सोसायटीचे संस्थापक आणि निमंत्रक, रोहित जोशी यांनी सांगितले.
यावर्षी बोरीवली तसेच भेंडीनाला येथील स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवकांनी प्लास्टिकच्या बाटल्या, मद्याचे कॅन, थर्माकाॅल आणि इतर कचरा गोळा केला. या कचऱ्यामुळे परिसंस्थेला धोका निर्माण होतो असे येऊर एनव्हायर्नमेंटल सोसायटीचे संस्थापक आदित्य साळेकर यांनी सांगितले.