कल्याण बदलापूर राज्यमार्गावर खोदकामाचा अडथळा,वाहतूक कोंडी भर | Excavation obstruction on Kalyan Badlapur National Highway adds to traffic congestion amy 95 | Loksatta

कल्याण बदलापूर राज्यमार्गावर खोदकामाचा अडथळा,वाहतूक कोंडी भर

सातत्याच्या खोदकामामुळे प्रवासी संतप्त

कल्याण बदलापूर राज्यमार्गावर खोदकामाचा अडथळा,वाहतूक कोंडी भर
कल्याण बदलापूर राज्यमार्गावर खोदकामाचा अडथळा

एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या आणि व्यवस्थापनासाठी सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या कल्याण बदलापूर राज्यमार्गावर सातत्याने होत असलेल्या खोदकामामुळे प्रवाशांमध्ये संताप आहे. त्यामुळे राज्यमार्गावर वाहतूक कोंडी होत असून वारंवार होणाऱ्या खोदकाम आता रोखण्याची विनंती केली जाते आहे. विशेष म्हणजे हे खोदकाम परवानगी घेऊन सुरू आहे का विनापरवाना याबाबतही गोंधळ पहायला मिळतो आहे.

हेही वाचा >>>ठाण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडल्याने पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम

कल्याण बदलापूर राज्यमार्गाची उभारणी अनेक वर्षांच्या रखड़पट्टीनंतर झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या रस्त्याचे काम केले गेले. मात्र आजही या रस्त्याचे बहुतांशी काम अपूर्ण आहे. मात्र मधल्या काळात हा राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरीत करण्यात आला. सध्या या रस्त्यावरून वाहतूक सुरू असून कल्याण ते बदलापूर या शहरांना जोडण्यासाठी हा रस्ता महत्वाचा आहे. मात्र या रस्त्याच्या कडेला विविध कामांसाठी सातत्याने खोदकाम केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे. जलवाहिन्या, वीज वाहिन्या, सांडपाणी वाहिन्या यांसाठी सातत्याने हा रस्ता खोदला जातो आहे. या मार्गाखाली जलवाहिन्या गाडल्या गेल्याने अनेकदा रस्त्याचा मोठा भाग बंद करून खोदकाम करावे लागते. काही महिन्यांपूर्वी राज्यमार्गाखाली सांडपाणी वाहिनी दुरूस्तीसाठी मार्ग विमको नाका परिसरात खोदण्यात आला. सध्या याच भागात मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असून पेव्हर ब्लॉक काढले जात आहेत. तर शेजारीच काही दिवसांपूर्वी महावितरणाच्या माध्यमातून खोदकाम केले गेल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. मात्र सातत्याने होणाऱ्या या खोदकामांमुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे. एकाच वेळी खोदकाम करून घ्या अशी मागणी आता नागरिकांमधून होते आहे.

हेही वाचा >>>घरासमोर घाण करु नको सांगितले म्हणून कल्याणमध्ये रहिवाशाला मारहाण

सार्वजनिक बांधकाम विभाग अनभिज्ञ
कल्याण बदलापूर राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही खोदकामासाठी या विभागाची परवानगी घेऊन त्याचा खर्च विभागाला द्यावा लागतो. पुढे सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता सुस्थितीत करत असते. मात्र सध्या कुणातर्फे खोदकाम सुरू आहे याची पुरेशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागालाच नसल्याचे समोर आले आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच तपासणी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 18:16 IST
Next Story
ठाण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडल्याने पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम