दिव्यातील पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा शहराला येत्या आठवडय़ाभरात अतिरिक्त पाच दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित विभागाला दिले. त्यामुळे लवकरच दिवा शहरामधील पाण्याची टंचाई काही प्रमाणात मिटण्याची चिन्हे आहेत.

दिवा शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अखत्यारित असलेल्या बारवी धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. निळजे व कल्याण फाटा रिव्हरवूड येथून केलेल्या जोडणीतून हा पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेची आहे. शहरासाठी ३१.५ दशलक्ष लिटर पाण्याचा साठा मंजूर करण्यात आला आहे. परंतु येथे २७ ते २८ दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. त्यामुळे दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात शहरात तीव्र पाणीटंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागत असतो. दिवा शहरास अतिरिक्त १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याची मागणी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार येत्या आठवडय़ाभरात दिवा शहराला पाच दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश या वेळी सुभाष देसाई यांनी दिले.