डोंबिवली: कल्याण पूर्वेतील एका नोकरदाराला पाच जणांच्या टोळक्याने विदेशी चलन देण्याचे आमीष दाखवून त्यांच्याकडून पाच लाख रूपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. विदेशी चलनाच्या नावाखाली कापडी पिशवीत जुने रद्दी पेपर गुंडाळून देऊन तेथून भामट्यांनी तेथून पळ काढला.

सोमवारी सकाळी डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकाच्या बाहेर हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. शैलेंद्र चव्हाण (४७) असे फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव आहे. ते कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागात राहतात. चार पुरूष आणि एक महिला अशा टोळक्याने चव्हाण यांची फसवणूक केली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात चव्हाण यांनी तक्रार केली आहे.

हेही वाचा… ठाण्यातील काही भागात गुरुवारी पाणी नाही

पाच जणांनी तक्रारदार शैलेंद्र चव्हाण यांचा विश्वास संपादन केला. त्यांना पाच लाख रूपये किमतीचे दिराम हे विदेशी चलन भारतीय चलनाच्या बदल्यात देण्याचे कबूल केले. विदेशी चलन मिळते म्हणून चव्हाण यांनी पाच लाख रूपये भारतीय चलनातील देण्याचे आरोपींना कबुल केले. कोपर रेल्वे स्थानका जवळ आरोपींनी चव्हाण यांना सोमवारी बोलावून घेतले. त्यांच्याकडून भारतीय चलनातील पाच लाख रूपये काढून घेऊन आरोपींनी विदेशी चलनाच्या नावाखाली जुने रद्दी पेपर गुंडाळलेली एक कापडी पिशवी चव्हाण यांना दिली. ही पिशवी घरी गेल्यावर उघडा, असा सल्ला आरोपींनी तक्रारदाराला दिला.

हेही वाचा… कळवा रुग्णालयात २४ तास शवविच्छेदन सुविधा नाहीच; डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांअभावी सुविधा पुरविण्यात अडचणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिशवी उघडण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळावरून गायब झाले. चव्हाण यांनी घटनास्थळीच पिशवी उघडली. त्यावेळी विदेशी चलनाऐवजी त्यात जुने रद्दी पेपर गुंडाळलेले आढळून आले. चव्हाण यांनी कोपर रेल्वे स्थानक परिसरात आरोपींचा शोध घेतला. ते पळून गेले होते. विष्णुनगर पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत.