दोन वर्षांच्या खंडानंतर बदलापूर शहरातील माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने भरणाऱ्या जत्रेत रविवारी भाविकांची तुफान गर्दी झाली. त्यामुळे बदलापूर पूर्वेतील स्थानकाशेजारचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. स्टेशनपाडा ते थेट गांधी चौकापर्यंत ही गर्दी पसरली होती. शनिवार आणि रविवार अशा लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी जत्रेला हजेरी लावली. लहान मुले, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनीही जत्रेचा अनुभव घेतला.
महानगर क्षेत्रातील स्थानकाशेजारी भरणारी एकमेव जत्रा म्हणून बदलापूर शहरातील माघी गणेशोत्सवाच्या जत्रेकडे पाहिले जाते. माघी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेतला. करोना आपत्ती काळात दोन वर्ष शेजारच्या मंदिरात दीड दिवस उत्सव साधेपणाने केल्यानंतर यंदा उत्साहात गणेशाची स्थापना करण्यात आली. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून येथे लक्ष्मी महलाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
हेही वाचा – कळवा-मुंब्य्रात राजकीय बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे
२५ जानेवारीपासून ३ फेब्रुवारीपर्यंत सुरू असलेल्या या उत्सवात दोन वर्षांच्या खंडानंतर जत्रा भरली. स्थानकाशेजारी स्टेशनपाडा ते थेट महात्मा गांधी चौकापर्यंतच्या रस्त्यावर ही जत्रा भरली आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत या जत्रेला भाविकांनी तुफान गर्दी केली. रविवारी स्थानक परिसर गर्दीने फुलला होता. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरे, रायगड जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने भाविक गणेशोत्सवासाठी आल्याची माहिती मंडळाचे सचिव अविनाश खिल्लारे यांनी दिली आहे.
बदलापूरच्या जत्रेचे यंदाचे ५५ वर्ष आहे. २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षापासून येथे जत्रेला सुरुवात झाली. त्यावेळी बदलापूर शहराच्या स्थानक आणि आसपासचा परिसर मोकळा असल्याने जत्रेला पुरेशी जागा होती. मात्र शहरीकरणाच्या रेट्यात आता जत्रेसाठी जागा उरलेली नाही. त्यामुळे स्थानक परिसरात जत्रेमुळे कोंडी वाढते. त्यातही जत्रा तग धरून आहे.