ठाणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर किसन नगर येथील घटनेनंतर दाखल करण्यात आलेले गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे रद्द करून सामाजिक शांततेसाठी खऱ्या गुन्हेगारांना अटक करा. अशी मागणी ठाणे खासदार राजन विचारे यांच्यासमवेत शिवसेना जिल्हा शाखेच्या शिष्टमंडळाने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील किसन नगर येथे १४ नोव्हेंबर रोजी शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या समवेत इतर पदाधिकारी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले होते. पोलीस स्थानकातून बाहेर पडताना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी विचारे यांच्यावर पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या तर त्यांच्या समवेत असलेल्या काही पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या आवारातच मारहाण केली. यानंतर पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला होता. मात्र यांनतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही पद्धतीचा गुन्हा केलेले नसताना देखील त्यांच्यावर पोलिसांनी विविध कलमांच्याया अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे असा आरोप करत पोलिसांनी हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा: बदलापूरातील रिक्षा चालक बेमुदत संपावर; रिक्षा थांबा हटवल्याने चालकांचा संताप

यासाठी शिवसेना जिल्हा शाखेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची नुकतीच भेट घेऊन पत्र देण्यात आले आहे. या शिष्टमंडळात ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शिवसेना प्रवक्ते चिंतामणी कारखानीस, शहर प्रमुख प्रदीप शिंदे तसेच धर्मराज पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, युवसेना अधिकारी किरण जाधव, विभाग संघटक अनिता हिलाल आणि इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पोलिसांचा आदर करावा हीच दिघे साहेबांची शिकवण आहे. गुरुवर्य आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी पोलिसांचा आदर करावा अशी शिकवण आम्हाला दिली. ज्या दिवशी पोलिसांची दहशत संपेल त्या दिवशी आपल्या आई – बहिणींवरती अत्याचार होऊन गुंडाराज येईल. आम्ही शिष्य म्हणून त्याचे अनुकरण करत आहोत अशी प्रतिक्रिया खासदार राजन विचारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा: ठाणे जिल्ह्यात गारठा वाढला; बदलापुरात सर्वात कमी तापमानाची नोंद

पत्रात काय म्हटले आहे ?
१४ नोव्हेंबर रोजी रात्री ९:३० वाजता खासदार राजन विचारे व त्यांच्यासोबत असलेले लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ते चिंतामणी कारखानीस व इतर शिवसेना पदाधिकारी नव्याने नियुक्त झालेले उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्या किसन नगर भटवाडी येथील कार्यालयाला भेट देण्यास गेले होते. त्यावेळी माजी नगरसेवक योगेश जानकर यांनी व सोबतच्या गुंडांनी शिवसेना पदाधिकारी दीपक साळवी व हेमंत नार्वेकर यांना बेदम बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यासोबत १५० ते २०० चा जमाव होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित नसल्याने गुन्हा दाखल केला जात नव्हता. तसेच सदर प्रकरणी गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी खासदार व त्यांच्यासोबत असलेले सर्व पदाधिकाऱ्यांना पोलीस स्थानकामध्ये तात्कळत बसविण्यात आले होते. त्या संपूर्ण घटनेवेळी शिंदे गटाचे नरेश मस्के यांनी कोपरीतून किंवा आणखीन कुठून गुंड बोलविले होते ठाऊक नाही. परंतु साधारणता १ हजार ५०० गुंडांनी श्रीनगर पोलीस स्थानकाबाहेर जमा करून पोलीस स्थानकाला घेरले होते. सर्व गुंड हत्यारा सहित पोलीस स्थानकाच्या आवारात दंगल घडविण्यासाठी व आम्हाला शारीरिक इजा करण्याच्या उद्देशाने पोहोचले होते. त्याच प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये आम्ही बसलो असताना कोणी दत्ता फासले या नावाचा इसम वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये येऊन “बाहेर येऊन दाखवा तुमचे हात पाय मोडू” अशी धमकी देऊन निघून गेला. या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार फोन करून या पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे संशयित निदर्शनास येत होते. यानंतर ज्यांनी खरी मारहाण केली त्यांनीच पोलीस आयुक्त कार्यालयात उपस्थित राहून खोटे व प्रभावी गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. हा कहरच आहे. खोटे गुन्हे दाखल होत असताना पोलिसांना उमगले नाही का? तसेच उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी कोणताही गुन्हा केला नसतानाही त्यांच्यावर कलम ३२३, ५०४, १४३, १४७, १४९, व ३७ असे खोटे गुन्हे दाखल करून सदर कलमे लावण्यात आलेले आहेत. श्रीनगरपोलीस स्थानकाच्या आवारात पोलिसांच्या संरक्षणामध्ये आम्ही बाहेर पडत असताना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून आमच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या.

त्यावेळी त्या समुहात उपस्थित असलेले नरेश म्हस्के यांनी पोलीस संरक्षणात असताना आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून न्यूज चॅनल च्या पत्रकारांना कॅमेरे बंद करण्यास प्रवृत्त केले, व त्यांच्यावर दमदाटी केली. यावरून पुन्हा असे सिद्ध होत आहे कि, सदर हल्ला पूर्वनियोजित असल्याने माझ्या जीवाला धोका असल्याने आपण माझी कमी केलेली अंगरक्षक सुरक्षा पुन्हा पूर्ववत करण्यात यावी. सर्व पदाधिकारी श्रीनगर पोलीस स्थानकातून बाहेर निघून जात असताना गुन्हेगार असलेला सिद्धू अभंगे या इसमाने पोलिसांना धक्का – बुक्की करून दीपक साळवी आणि पदाधिकाऱ्यांवर पुन्हा हात उगारला. यानंतर पोलिसांनी त्याच्या सोबत असलेल्या सर्व गुंड प्रवृत्तीच्या इसमांवर लाठीमार सुरू केला. याच गुंडांवर झालेल्या लाठीमाराला पोलीस मारहाण करीत असल्याचे दाखवून पोलिसांवर दबाव टाकण्याचे काम नरेश म्हस्के करीत होते. पोलीस प्रशासन ही एक घटनात्मक व्यवस्था आहे. त्यामुळे ती कायद्यानुसारच असायला हवी. अन्यथा महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. आमच्या पदाधिकाऱ्यांनी कोणताही गुन्हा केला नसल्याने पदाधिकाऱ्यांवर लावलेले खोटे गुन्हे त्वरित रद्द करण्यात यावे. तर या प्रसंगी दंगलीत चिथावणी देणाऱ्या, आमच्यावर जीवघेणा हल्ला करण्यास जमावास प्रवृत्त करणाऱ्या नरेश म्हस्के, राम रेपाळे, योगेश जाणकर, राहुल लोंढे, विकास रेपाळे, सिद्धू अभंगे, दत्ता फासले या इसमांवर योग्य कारवाई करून त्यांना सामाजिक शांततेसाठी त्वरित अटक करावी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: False and serious crimes against thackeray group activists should be cancelled mp rajan vichare demand cp thane tmb 01
First published on: 19-11-2022 at 16:31 IST