कल्याण- २७ गाव हद्दीतील पिसवली गावामधील काही चाळींमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्यापासून दररोज पाणी शिरत होते. पाणी उपसून हैराण झालेल्या रहिवाशांनी आय प्रभागाच्या अधिकाऱ्यांकडे चाळ परिसरात तुंबलेले पाणी बाहेर काढण्याची मागणी केली. आय प्रभागाच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने या भागातील पाणी वाहून जाईल अशी मार्गिका तयार करुन ३० कुटुंबांची जलमय परिस्थितीमधून सुटका केली.
मलंग गड रस्त्यावरील सनराईज शाळेच्या परिसरात अनेक चाळी आहेत. या चाळींच्या परिसरातून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी यापूर्वी नैसर्गिक प्रवाह होते. हे प्रवाह या भागात झालेल्या बेकायदा चाळी, इमारती बांधताना भूमाफियांनी बंद केले. आता पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने मुसळधार पावसाचे पाणी पिसवली भागातील अनेक चाळींमध्ये शिरते. गेल्या आठवड्यापासून रहिवासी घरात शिरलेले पाणी उपसून थकले आहेत.
हेही वाचा >>> ठाण्यात उड्डाणपुलांखाली बनले धबधबे ; अपघातांची भीती
रहिवाशांनी पाणी जाण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण काही जमीन मालकांकडून हरकत घेण्यात आली. यासंदर्भात काही रहिवाशांनी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना चाळ परिसरात होत असलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.
मागील आठवड्यापासून घरात पाणी तुंबून राहत असल्याने घरातील लहान बाळे, वृध्द, शाळकरी मुले यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. या तुंबलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती रहिवाशांना होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी तातडीने पिसवली मधील जलमय असलेल्या चाळींच्या भागात जेसीबीच्या साहाय्याने जाऊन चाळ परिसरात तुंबलेल्या पाण्याला मार्ग काढून देण्यात महत्वाची कामगिरी केली.
तुंबलेल्या पाण्याला तीन ते चार ठिकाणी मार्ग करुन दिल्याने अनेक दिवस जलमय असलेल्या चाळीतील कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हेही वाचा >>> ठाणेकरांनो, शक्य असल्यास मुंबई नाशिक महामार्गावरून वाहतूक टाळा ; ठाणे पोलिसांचे आवाहन
नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरणाऱ्या चिंचपाडा भागातील बेकायदा चाळी, नव्याने उभारण्यात येत असलेली जोत्याची बांधकामे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्या आदेशावरुन तोडकाम पथकाने जमीनदोस्त केली.
“ आय प्रभाग हद्दीत कोठेही पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतली जात आहे. पिसवली भागात पाणी तुंबल्याची तक्रार आल्यानंतर तातडीने तेथील पाणी जेसीबीच्या साहाय्याने मोकळे करण्यात आले. बेकायदा बांधकामामुळे पाणी तुंबत असेल तर ते बांधकाम तातडीने तोडले जाते.” हेमा मुंबरकर- साहाय्यक आयुक्त,आय प्रभाग, कल्याण.