डोंबिवली – अलीकडच्या कार्पोरेट काळात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील रुग्ण सेवाविषयक सुसंवाद दुरावत चालला आहे. त्यामुळे वैद्यकीय रुग्ण सेवेत नवनवीन प्रश्न निर्माण होत आहेत. यापूर्वीही डॉक्टर रुग्ण सेवा देत होते, पण आतासारखे किचकट प्रश्न आरोग्य सेवेत निर्माण होत नव्हते. याचे महत्वाचे कारण म्हणजे कुटुंब वैद्य (फॅमिली डॉक्टर) त्यावेळी प्रबळ होती. आरोग्य सेवेत रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात गैरसमजाचे प्रश्न निर्माण होऊच नयेत असे वाटत असेल तर यासाठी पूर्वीची कुटुंब वैद्य ही संकल्पना बळकट होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डोंबिवलीतील ज्येष्ठ डॉक्टर दामोदर नंदा यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
ब्राह्मण सभा, डोंबिवली शाखेतर्फे मागील तीस वर्षापासून डोंबिवली शहर परिसरात समर्पित भावाने वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टरांना धन्वंतरी आणि भिषग्वर्य पुरस्कार देऊन गौरविले जाते. धन्वंतरी पुरस्कारासाठी यावर्षी डाॅ. दामोदर नंदा यांची, तर भिषग्वर्य पुरस्कारासाठी डॉ. महेश पाटील यांची निवड करण्यात आली.
या दोन्ही गौरवमूर्ती डॉक्टरांचा ब्राह्मण सभा सभागृहात ज्येष्ठ हदयरोग तज्ज्ञ डॉ. दयानंद कुंबळा, ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ आणि ब्राह्मण सभेचे विश्वस्त डॉ. उल्हास कोल्हटकर, कार्याध्यक्ष संजय कानिटकर, उपाध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, वैद्यकीय सेवा समिती प्रमुख डॉ. मेधा ओक यांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. दामोदर नंदा मागील ५० वर्षापासून डोंबिवलीत चार रस्त्यावर कुटुंब वैद्य म्हणून समर्पित भावाने वैद्यकीय सेवा देत आहेत. समाजाच्या विविध स्तरात आणि भानुशाली ज्ञाती समाजात डॉ. नंदा थॅलॅसेमिया आणि जीएटपीडी डेफिसिएन्सी या असाध्य रोगांसंबंधी जनजागृती करण्याचे काम करत आहेत.
‘अलीकडे जीवनशैलीत बदल झाला आहे. वेळेवर भोजन घेतले जात नाही. झोप वेळेवर मिळत नाही. चटपटीत खाण्याकडे लोकांचा ओढा वाढला आहे. विविध प्रकारच्या ताण तणावात, चिंतेमध्ये बहुतांशी नागरीक आपले जीवन व्यतित करत आहेत. या बदलत्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, हदयविकार अशा अनेक व्याधी नागरिकांना घेरत आहेत.
अशा चुकीच्या जीवनशैली टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आणि आपणास काही व्याधी, आजार झाला असेल तर गुगल, कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा आधार घेऊन त्या माहितीच्या आधारे स्वताहून स्वतावर उपचार करण्याचा प्रयत्न करू नका. यासाठी डॉक्टरी सल्ला खूप महत्वाचा आहे,’ असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. दयानंद कुंबळा यांनी सांगितले. डाॅक्टर आणि शेतकरी हे माणसाच्या अस्तित्व आणि जीवनाच्या वाटचालीतील महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे ब्राह्मण सभेने आता डाॅक्टरांनंतर आता आदर्शवत पध्दतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी एखादा पुरस्कार सुरू करावा आणि बळीराजाचा सन्मान करावा, अशी सूचना डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी केली.