डोंबिवली : डोंबिवलीतील मोठागाव रेतीबंदर येथील माणकोली पुलावर दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेता संजय दत्त चित्रीकरणाच्या कामासाठी आले होते. ‘धुरंदर’ या चित्रपटातील एका भूमिकेत ते आहेत. या चित्रपटातील चित्रीकरणाचा एक भाग डोंबिवलीतील माणकोली पुलावर चित्रित करण्यात आला. अभिनेता संजय दत्त डोंंबिवलीत आल्याने डोंबिवली, भिवंडी, कल्याण, ठाणे परिसरातील त्यांच्या विविध वयोगटातील चाहत्यांनी माणकोली पूल परिसरात तुफान गर्दी केली होती. यामध्ये तरूणांचा सर्वाधिक भरणा होता.
‘धुरंधर’ चित्रपटाचे माणकोली पुलावरील चित्रीकरण उरकून दोन दिवस झाले तरी डोंंबिवली, कल्याण परिसरातील तरुणांमध्ये माणकोली पुलावर चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी आपला आवडता अभिनेता संजय दत्त उर्फ संजुबाबा यांना आपण कसे पाहिले. आपण मोठ्या आवाजात संजुबाबा म्हणून आवाज दिल्यावर संजय दत्त यांनी आपल्याकडे पाहून हात उंचावत आपणास कसा प्रतिसाद दिला. आपण आपल्या मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून अभिनेता संजुबाबा यांना कसे कैद केले. त्यांच्या विविध भावमुद्रा, प्रतिमा आपल्या मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न केला, याचीच चर्चा डोंबिवली, कल्याण, भिवंडी परिसरातील तरूणांमध्ये रंगली आहे.
माणकोली पुलावरील चित्रीकरणाच्यावेळी संजय दत्त यांच्या जशा भावमुद्रा आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. तशाच त्या अनेक तरूणांनी आपल्या मोबाईल डिपीमध्ये स्थापन्न केल्या आहेत. आपण संजुबाबा म्हणून मोठ्याने आवाज दिल्या बरोबर अभिनेत्याने आपल्याकडे हात उंचावून आपल्याकडे पाहून आपणास प्रतिसाद दिला, हा अनुभव बहुतांशी तरुणांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे.
डोंबिवलीतील केशकर्तनालयातील एका कारागिराने सांगितले, शनिवारी सकाळी एक तरूण आपल्या दुकानात दाढी कापण्यासाठी खुर्चीत बसला होता. त्याची दाढी कापण्याचे काम आपल्याकडून सुरू होते. या तरूणाला त्याच्या मित्राने मोबाईलवर संपर्क केला. आणि डोंबिवलीत माणकोली पुलावर अभिनेता संजय दत्त येणार आहे, असे दाढी करणाऱ्या तरूणाला कळविले. हे वाक्य ऐकताच अस्वस्थ झालेल्या खुर्चीतील तरूणाने आपणास झटपट दाढी करण्यास सांगितले. घाईघाईत त्याने दाढी करून घेतली. तो सुसाट माणकोली पुलाच्या दिशेने गेला.
माणकोली पुलावर चित्रीकरणाच्यावेळी अधिक संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संंजय दत्त यांची खासगी सुरक्षा चारही बाजुने तैनात होती. तरीही तरूण चाहते पुलाचे कठडे, रस्ता दुभाजकांवर उभे राहून संजुबाबा नावाने घोष करत होते. अनेक तरूणांनी आहे त्या परिस्थितीत संजय दत्त सोबत दूरवरून मोबाईलवरून स्वयंप्रतिमा काढण्याचा प्रयत्न केला.
संजय दत्त आपला आवडता अभिनेता आहे. आपण त्यांना दररोज पाहू शकत नाही. डोंबिवलीत माणकोली पुलावर ते येण्याचे समजल्यावर त्यांना पाहण्यासाठी आपण आवर्जुन हजेरी लावली होती.- मारूती भुसारे संजय दत्त चाहता.डोंबिवली
डोंबिवलीत अभिनेता संजय दत्त येणार आहे हे आपणास केशकर्तनालयात समजले. तेथील कार्यक्रम पार पाडून आपण दुचाकीने थेट माणकोली पुलावर पोहचलो. आपला आवडता अभिनेता अनेक वर्षांनी प्रथमच प्रत्यक्ष पाहिला याचे समाधान वाटले.- सत्यम धोंडीबा भोवाळ, संजय दत्त चाहता,डोंबिवली.