डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते तीन स्थानकांच्या दरम्यान प्रवास करणारे अनेक प्रवासी पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे मार्गात उड्या मारुन लोखंडी अडथळे ओलांडून जीवघेणा प्रवास करत आहेत. मागील अनेक दिवसांपासून प्रवासी अशापध्दतीने प्रवास करत असताना रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, लोहमार्ग पोलीस, तिकीट तपासणीस याविषयी कारवाई करत नसल्याने प्रवाशांना बळ मिळत आहे, अशा तक्रारी अनेक जागरुक प्रवासी करत आहेत.
हेही वाचा >>>माघी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मलंग गडावर
रेल्वे मार्गात उडी मारुन दोन रेल्वे मार्गिकांमधील अडथळा ओलांडताना जर टोकदार लोखंडी गजाचे टोक, पाय, हाताला लागले. उडी मारताना शर्ट किंवा विजार लोखंडी टोकात अडकली आणि त्याचवेळी लोकल स्थानक आली तर प्रवाशाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे. डोंबिवली पश्चिमेतून येणारे अनेक प्रवासी फलाट एक वरील जिने चढण्याचा त्रास वाचविण्यासाठी फलाट एकवरील कल्याण बाजुकडील मार्गिकेत उडी मारुन रेल्वे मार्गातून फलाट क्रमांक तीनवर जातात. डोंबिवली पश्चिमेत कल्याण बाजुकडे फलाट क्रमांक तीन किंवा चारवर उतरणारे अनेक प्रवासी रेल्वे मार्गातून स्थानकातील फलाट क्रमांक एकच्या दिशेने येतात.
हेही वाचा >>>वाहन कोंडी टाळण्यासाठी पेंढरकर काॅलेज ते घरडा सर्कल वाहतुकीचे नियोजन
रेल्वे मार्गात फलाट एक आणि एक ए यांच्यामध्ये लोखंडी अडथळे आहेत. त्या लोखंडी टोकदार अडथळ्यांवरुन प्रवासी प्रवास करतात. सकाळच्या वेळेत लोकलची वारंवारिता अधिक असते. संध्याकाळच्या वेळेत अशीच परिस्थिती असते. या गर्दीच्या वेळेत प्रवासी झुंडीने रेल्वे मार्ग ओलांडून येजा करतात.
रेल्वे स्थानकात सरकते जीने, स्कायवाॅक, इच्छित स्थळी जिने असताना प्रवासी हा जीवघेणा प्रवास करत असल्याने अनेक जागरुक प्रवासी याविषयी नाराजी व्यक्त करतात. रेल्वे सुरक्षा बळाचे जवान याविषयी कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फलाट क्रमांक एकवर स्थानक व्यवस्थापक, लोहमार्ग पोलीस ठाणे आहे. तरीही रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात नाही, अशा प्रवाशांच्याच तक्रारी आहेत.