अतिक्रमण रोखण्यास, जैवविविधता सुरक्षेसाठी मदत

किशोर कोकणे
ठाणे : मुंबई तसेच उपनगरांची फुप्फुसे मानल्या जाणाऱ्या आणि अतिसंवेदनशील क्षेत्र असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन अधिक कार्यक्षमतेने व्हावे यासाठी राज्य सरकारने बोरिवली तसेच येऊर वनक्षेत्रात स्वतंत्र उपसंचालक कार्यालयांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. वरवर पाहाता हा प्रशासकीय पातळीवरील निर्णय वाटत असला तरी यांमुळे येऊर आणि तुंगारेश्वर या ठाण्याकडील बाजूस असलेल्या दोन महत्त्वाच्या वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी स्वतंत्र्य मनुष्यबळ तसेच निधीचा विनियोग करता येणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर आणि पालघर जिल्ह्य़ातील तुंगारेश्वर अभयारण्य ही संरक्षित क्षेत्रे येतात. या वनक्षेत्रांचे क्षेत्रफळ अनुक्रमे १०४.४४ चौ. किमी. आणि ८५.७० चौ. किमी. आहे. या सर्व वनक्षेत्रातील प्रशासकीय व्यवस्थापनाचे अधिकारी वनसंरक्षक व संचालक यांच्याकडे आहेत. त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे उद्यानातील वनक्षेत्रांतील विभागांचा कारभार असतो. असे असले तरी इतक्या मोठय़ा वनक्षेत्राचा कार्यभार बोरिवली येथे केंद्रिभूत असल्याने वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना अतिक्रमण, बेकायदा बांधकामे आणि प्राण्यांच्या शिकारी रोखण्यासाठी तसेच काही प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी अनेक अडचणी येतात.

लहानसहान कामानिमित्त बोरिवली येथील मुख्य कार्यालयात जावे लागते. त्यामुळे अनेकदा महत्त्वाचे कामकाज रखडत असे. तसेच हे क्षेत्रफळ मोठे असल्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची प्रशासकीय पुनर्रचना करण्याचा विचार वनअधिकाऱ्यांचा होता. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या एका उच्चस्तरीय स्थायी समितीच्या बैठकीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुख्य वनसंरक्षक व संचालक यांच्यानंतर आता येऊर आणि बोरिवली येथे उपसंचालकांची दोन स्वतंत्र कार्यालये निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

अनेक प्रकारांवर नियंत्रण मिळवणे सुलभ

येऊर क्षेत्र हे अतिसंवेदनशील क्षेत्र असूनही या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात राजकीय नेते, व्यवसायिकांनी बंगले बांधले आहेत. सुट्टय़ांच्या दिवसांत मुंबई, ठाण्यातील अनेक जण येऊरमध्ये फेरफटका मारण्यासाठी जातात. त्यामुळे वनामधील शांतता भंग होते. तुंगारेश्वर क्षेत्रातही दारूच्या भट्टय़ा, प्राण्यांची शिकार होत असते. वाढते अतिक्रमण, हॉटेलांची बजबजपुरी, ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी तसेच वन्यजीवांची शिकार अशा तक्रारी सातत्याने पुढे येत असताना येऊर भागांत यापुढे वन उपसंचालकांचे स्वतंत्र कार्यालय उभारले जाणार असल्याने या प्रकारांवर नियंत्रण मिळविणे तसेच यासंबंधीच्या तक्रारींची जबाबदारी निश्चित करणे अधिक सोपे होणार आहे. ठाणे तसेच पालघर जिल्ह्य़ातील पर्यावरणप्रेमी तसेच तज्ज्ञांना विविध विषयांचा पाठपुरावा करणेही सुलभ होऊ शकेल, असा दावा केला जात आहे.

नवी संरचना अशी असेल..

वनसंरक्षक व संचालक यांच्यानंतर उपसंचालक येऊर आणि उपसंचालक बोरिवली या नव्या पदावर अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल. उपसंचालकांनंतर साहाय्यक वनसंरक्षक त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी अशी रचना असणार आहे. येऊर उपसंचालकांकडे तुंगारेश्वर अभयारण्याचा कारभार असणार आहे.