ठाणे- दिव्यांग बांधवांना शासकीय योजना, सुविधा आणि सेवांचा लाभ अधिक सुलभ आणि परिणामकारक पद्धतीने मिळावा यासाठी नुकतेच ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय कार्यान्वित करण्यात आले असतानाच, आता या कार्यलयामार्फत दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.
समाजातील दिव्यांग व्यक्तींना सामान्य कौटुंबिक जीवन जगता यावे तसेच दिव्यांग आणि अव्यंग व्यक्तींमध्ये विवाहास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाने “दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजना” लागू केली आहे. या योजनेनुसार, किमान ४०% किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्व असलेली वधू किंवा वर जर अव्यंग वधू/वराशी विवाह करत असतील, तर त्या नवविवाहित जोडप्यास शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. १ एप्रिल २०१४ या आर्थिक वर्षापासून ते आता नव्याने विवाहीत होणाऱ्या जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींशी विवाह करण्यास अव्यंग व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे आणि समाजात दिव्यांगांविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच त्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी असा आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली.
असे मिळणार अर्थसहाय्य…
१. रक्कम रुपये २५०००/- चे बचत प्रमाणपत्र.
२. रुपये २००००/- रोख स्वरुपात.३. रुपये ४५००/- संसार उपयोगी साहित्य/वस्तू खरेदीसाठी देण्यात येईल.४. रुपये ५००/- स्वागत संमारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येईल.
– योजनेच्या अटी व शर्ती …
१. वधू अथवा वराकडे अपंग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान ४०% अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र असावे.
२. दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
३. विवाहीत वधू व वराचा प्रथम विवाह असावा. वधू अथवा वर घटस्पोटित असल्यास अशा प्रकारची मदत पुर्वी घेतलेली नसावी.
४. विवाह हा कायदेशीर रीत्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा.
५. विवाह झाल्यानंतर किमान एक वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय, ठाणे यांचेकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
– योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
१. विहती नमुन्यातील अर्ज सादर करणे.
२. सिव्हील सर्जन यांनी दिलेला अपंगत्वाचा दाखला व वधू वर एकत्रित फोटो.
३. विवाह नोंदणी दाखला.
४. दोन प्रतिष्ठित व्यक्तिंची शिफारस पत्रे /डोमीसाईल / आधारकार्ड / पॅनकार्ड/एकत्रित बँक अकाऊंट / ४ पासपोर्ट साईज फोटो