ठाणे : भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या सूचनेनुसार ठाणे जिल्ह्यात साक्षरता अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवार १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत विशेष आर्थिक साक्षरता मोहीम राबविण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासन आणि अग्रणी बँक व्यवस्थापनाच्या समन्वयाने ही मोहीम प्रभावीपणे कार्यान्वित केली जाणार असून, नागरिकांमध्ये विशेषतः ग्रामीण व वंचित घटकांमध्ये आर्थिक शिक्षण व जागरूकता वाढविण्यावर या उपक्रमाचा भर राहणार आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी देखील नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.

नागरिकांना आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत जिल्हा प्रशासनकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देखील दिल्या जातात. याच पार्श्वभूमीवर अधिक व्यापक स्वरूपात जिल्ह्यात तीन महिन्यांसाठी आर्थिक साक्षरता मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः ग्रामीण आणि मागास भागातील लोकसंख्येमध्ये आर्थिक साक्षरता वाढविणे हा आहे.

या उपक्रमात महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी सक्षम बनविणे, वृद्ध नागरिकांना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती करून देणे, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वित्तीय प्रणालीशी जोडणे, हे विशेष लक्ष ठेवून केले जाणार आहे. आजच्या डिजिटल युगात आर्थिक व्यवहार अधिकाधिक ऑनलाइन होत चालले आहेत. त्यामुळे डिजिटल आर्थिक साक्षरतेकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे, जसे की मोबाईल बँकिंग, यूपीआय व्यवहार, ऑनलाईन व्यवहार अॅप्स वापरण्याची योग्य माहिती देणे आणि त्यासंबंधी सुरक्षेचे भान निर्माण करणे.

याशिवाय, अनेकदा गरजूंना बँकांकडून कर्ज घेताना अयोग्य माहितीमुळे किंवा चुकीच्या माध्यमातून फसवणुकीचा सामना करावा लागतो. त्यामुळे जबाबदारीने आणि योग्य मार्गाने कर्ज घेणे, त्याची परतफेड कशी करावी, कर्ज घेण्यापूर्वी कोणती माहिती तपासावी याबाबत देखील जनजागृती केली जाणार आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये सायबर फसवणूक, फसवे फोन, खोट्या लिंकद्वारे होणारे व्यवहार यासंबंधी सावधगिरी कशी बाळगावी, हे मुद्देसूदपणे समजावून सांगितले जाईल.

तसेच, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना यांसारख्या केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या सामाजिक सुरक्षा योजनांविषयी नागरिकांमध्ये माहिती पसरविण्यावर भर दिला जाणार आहे. अनेक वेळा नागरिक योजनांबाबत अनभिज्ञ राहतात आणि त्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळत नाही.

या योजनांचे लाभ, पात्रता निकष, अर्ज करण्याची प्रक्रिया याची सोप्या भाषेत माहिती दिली जाईल, जेणेकरून प्रत्येक पात्र व्यक्ती या योजनांचा लाभ घेऊ शकणार आहे. ही मोहीम ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, जिल्हा बँक यांच्या ग्रामीण शाखा या मोहिमेत सक्रीय सहभाग घेतील. बँक शाखांमार्फत शिबिरे, गावोगावी जाऊन जनजागृती आणि प्रचार कार्यक्रम राबविले जातील. दुर्गम व दुर्लक्षित भागांपर्यंत वित्तीय सेवा पोहोचविण्यावर विशेष भर दिला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व नागरिक, स्वयं-सहायता समूह, ग्रामस्तरीय अधिकारी, पंचायत प्रतिनिधी व स्थानिक प्रसारमाध्यमांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी किंवा आपल्या परिसरातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नजीकच्या बँक शाखेशी किंवा ठाणे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.