tv18मुलीचे लग्न झाल्यानंतर सासर-माहेर जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. मुलीचा हळूहळू माहेरचा ओढा कमी होत जातो. व्यक्तिगत प्रेम, जिव्हाळा कायम असला तरी सासरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्या साठीची धावपळ यामध्ये विवाहित मुली व्यस्त होतात. तरीही, आई, वडिलांनी लहानपणी आपल्यासाठी खालेल्या खस्ता, काढलेला त्रास हा विचार अनेक विवाहित मुलींच्या मनात सासरला रुळल्या असताना रुंजी घालत असतो. हा विचार करून आई, वडिलांना पुढील आयुष्य सुखाचे जावे, त्यांच्या सामाजिक कार्यात कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये. म्हणून सासरच्या मंडळींच्या सहमतीने माहेरच्या माणसांना आर्थिक मदत करण्याचे काम दोन विवाहित मुली करीत आहेत.  

निशा मोराइस-फर्नाडो
 tv20कल्याणमधील सामाजिक कार्यकर्त्यां स्टेला मोराइस प्रेमसेवा महिला मंडळाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्य़ाच्या आदिवासी, दुर्गम भागात तेथील समाजासाठी कार्य करीत आहेत. अनेक वर्ष त्यांचे हे सामाजिक कार्य सुरू आहे. या कार्याला त्यांचे पती जिम्मी, कुटुंबीयांचा हातभार असतो. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता आई स्टेला हिचे सुरू असलेले काम मुलगी निशा मोराइस पाहत होती. निशाचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना आईच्या सामाजिक कार्यात तिचे डोकावणे सुरू होते. निशाने देश, परदेशात हवाई वाहतूक क्षेत्रातील पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले. एका सरकारी हवाई वाहतूक कंपनीत निशा मागील सात वर्षांपासून उच्चपदस्थ पदावर पायलट म्हणून सेवा देत आहे. नोकरीत दाखल झाल्यानंतर मिळालेला पहिला पगार निशाने आईच्या सामाजिक कार्यासाठी दिला. त्यानंतर तिने दर महिन्याला मिळणाऱ्या पगारातील चाळीस हजार रुपयांची रक्कम आईच्या सामाजिक कार्यासाठी देण्याचा संकल्प सोडला. सात वर्षांत ही रक्कम नियमितपणे आईच्या हातात पडत होती. गेल्या वर्षभरापूर्वी निशाचा विवाह तमीळनाडुतील एका प्रसिद्ध उद्योजकाशी झाला. त्याचवेळी निशाने पती प्रशांत आणि सासरच्या मंडळींना आईचे सामाजिक कार्य आणि त्यात आपण देत असलेले आर्थिक योगदान याची माहिती दिली. त्यांनीही तिच्या या संकल्पात अडथळा येऊ दिला नाही.

शीतल डाफळे
tv21धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या शीतल डापळे या तरुणीने झोपडपट्टीत राहून एम. एस्सी. पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वडील खासगी सुरक्षा रक्षक कंपनीत कामाला होते. वडिलांचा पगार दोन ते तीन हजार. शालेय शुल्क कसे भरायचे येथपर्यंत प्रश्न. आई गृहिणी. घरात भावंडं. परिस्थितीवर मात करीत शीतलने शिक्षण पूर्ण केले. एका कार्पोरेट कंपनीत शिक्षणाच्या जोरावर उच्च पदावर नोकरी मिळवली. आता लग्न होऊन शीतल डापळे-सवणे नवी मुंबईत सासरी राहत आहे. विवाहानंतर आपण सासरी जाऊ. गरिबीचे दिवस त्यांच्या वाटय़ाला कायम स्वरूपी राहू नयेत म्हणून शीतलने आई वडील, भावंडांसाठी विरार येथे एक सदनिका खरेदी केली. यासाठीचे बँक कर्ज, त्याचे हप्ते शीतलने स्वत: भरण्यास सुरुवात केली. विवाहानंतर शीतलने पती दिलीप, सासरच्या मंडळींना घरची बेताची परिस्थिती सांगितली. वडिलांच्या घराचे कर्ज आपणच फेडणार असल्याचे सांगितले. सवणे कुटुंबियानी सून शीतलचे म्हणणे मान्य केले. आता नवीन घराचे कर्ज शीतल फेडत आहे. डापळे कुटुंबीय धारावीतील घरातून विरारला नवीन घरात राहत आहेत.  
भगवान मंडलिक, कल्याण</strong>