कल्याणमधील आधारवाडी कचराभूमीला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीमुळे धुराचे लोट शहरातील नागरी वस्तीत पसरले होते. त्याचबरोबर अचानक दुर्गंधीयुक्त धूर येऊ लागल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग नियंत्रणात आणली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याणधील आधारवाडी कचराभूमीला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर परिसरातील रहिवाशांना सुरुवातीला रासायनिक कंपनीमधून दुर्गंधीयुक्त वास येतो की काय असे वाटले. मात्र घराच्या खिडक्या उघडल्यानंतर त्यांना आधारवाडी कचराभूमीला भीषण आग लागल्याचे दिसले. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे धुराचे लोट नागरी वस्तीत पसरत होते. घरातील वृद्ध, दम्याचा विकार असलेले रुग्ण, लहान बाळांना या धुरामुळे खूप त्रास झाला, असे रहिवाशांनी सांगितले.
आधारवाडी कचराभूमीवर विविध प्रकारचा कचरा मागील चाळीस वर्षापासून टाकण्यात आला आहे. या कचऱ्यामध्ये ॲल्युमिनियम, पितळ, इतर धातू, प्लास्टिक असे विविध प्रकारचे मिश्रण आहे. दरवर्षी कडक उन्हाळा सुरू झाला की आधारवाडी क्षेपण भूमीवरील कचरा तप्त होतो. त्यामधील मिथेनसारखे ज्वलनशील वायू तयार होतात. त्यामुळे हा कचरा आपोआप पेट घेतो.
यापूर्वी या कचरा भूमीवरील धातूचा कचरा वेचण्यासाठी कचरावेचक यांच्याकडून संध्याकाळच्या वेळेत कचरा भूमीला आग लावली जात होती. कचरा भूमीवरील प्लास्टिक, कागद इतर टाकाऊ कचरा जळून गेल्यानंतर कचरावेचकांना कचऱ्यातील धातूचे घटक शोधणे सोपे व्हायचे. गेल्या दोन वर्षापासून कल्याण डोंबिवली पालिकेने आधारवाडी कचराभूमी बंद करण्याचे नियोजन केले आहे. शहरातील कचरा ओला सुक्या पद्धतीने आणि इतर सुका कचरा विलगीकरण पद्धतीने गोळा केला जात आहे.
आधारवाडी कचरा भूमीवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यातून परिसरातील कचरावेचकांना आर्थिक उत्पन्न मिळेल अशी व्यवस्था घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी केली आहे. त्यामुळे यापूर्वी नागरिकांकडून कचरा भूमीला लावण्यात येणारे आगीचे प्रकार कमी झाले आहेत. कचराभूमीला मध्यरात्री लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली.