भटके श्वान, मांजरी, पक्षी यांचे हाल होत असल्याची प्राणिमित्रांकडून खंत
‘फटाकेमुक्त आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा,’ असा संदेश दरवर्षी विविध माध्यमांद्वारे देण्यात येत असला तरी त्याकडे सर्वाचेच दुर्लक्ष होते. यंदा दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी मोठय़ा आवाजाचे फटाके फोडण्यात आले, त्याचा मोठा फटका प्राणी व पक्ष्यांना बसला आहे. भटके श्वान, मांजरी, विविध पक्षी फटाक्यांमुळे जखमी झाले आहेत, तर फटाक्यांच्या आवाजाचा विपरीत परिणामही काही प्राणी-पक्ष्यांवर झाले आहेत. फटाक्यांमुळे प्राणी-पक्ष्यांचे हाल होत असल्याने प्रशासनाने काही प्रमाणात र्निबध घालण्याची सूचना प्राणिमित्रांनी व्यक्त केली आहे.
फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा आणि ध्वनी व वायुप्रदूषणापासून दूर राहा’ याबाबत दरवर्षी जागरूकता केली जाते. पण दिवाळी वर्षांतून एकदाच येते आणि फटाक्यांशिवाय दिवाळी म्हणजे जणू काही पाप, अशा आविर्भावात सर्रासपणे कर्णपटलांना दणके व हृदयाला हादरे बसेपर्यंत फटाके फोडले जातात. मात्र फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाने माणसांप्रमाणेच प्राण्यांवरही विपरीत परिणाम होत असतात. यंदाही फटाक्यांमुळे झालेल्या प्रदूषणाचा फटका पक्ष्यांना बसला आहे.
पक्ष्यांवर परिणाम
- फटाक्यांमुळे हवेत पसरलेल्या वायूंमुळे अनेक पक्ष्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवल्याचे मत पक्षीतज्ज्ञांनी नोंदवले आहे.
- फटाक्यांतून निघणारा धूर अथवा आकाशात उंच उडणाऱ्या फटाक्यांच्या धुरामुळे पक्ष्यांना खूपच त्रास होतो.
- पक्ष्यांना फटाक्यांमुळे भाजल्याचा घटना घडत नाहीत, पण वायुप्रदूषणाचा फटका पक्ष्यांना बसतो.
- फटाक्यांमुळे हवेत पसरलेल्या नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइडचा परिणाम पक्ष्यांच्या श्वसन यंत्रणेवर होतो.
- काही फटाके उंच जाऊन फुटतात. या फटाक्यांचा जळता तुकडा झाडांवर पडण्याची शक्यता असते. दिवसभर अन्न मिळविण्यासाठी वणवण भटकून रात्रीच्या वेळी अनेक पक्षी झाडांवर विश्रांती घेत असतात. या विश्रांतीच्यावेळी फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे पक्षी गर्भगळीत होतात.
कर्णकर्कश फटाक्यांचा माणसांपेक्षा पक्षी-प्राण्यांवर अधिक परिणाम होतो. झाडांखाली उडवण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे पक्ष्यांचा जीव जातो किंवा त्यांना गंभीर दुखापत होते. फटाक्यांच्या आवाजामुळे भटके कुत्रे आणि अन्य प्राणी सैरावैरा पळू लागतात. परिणामी बरेच जण गाडीखाली येऊन जीव गमावतात, मोठय़ा आवाजामुळे श्वानांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा जीव जातो.
– सलीम चरानिया, प्राणी अभ्यासक, वसई