कल्याण, डोंबिवलीतील रहिवाशांना सायकल चालविण्यासाठी, धावण्यासाठी स्वतंत्र्य मार्गिका पालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता आणि कल्याण पश्चिमेतील गांधारे-बारावे रस्त्यावरील विशेष मार्गिकेतून शनिवारी पहाटे पादचारी धावले आणि सायकल पटूंनी मोकळ्या वातावरणात सायकली चालविल्या. १५० हून अधिक रहिवासी, ६० पेक्षा अधिक सायकलपटू डोंबिवली, कल्याणमधील विशेष मार्गिकेतून पहाटे पाच ते सकाळी आठ वाजेपर्यंत धावले. दररोज सकाळी पाच ते सकाळी आठ वाजेपर्यंत ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावरील, गांधारे-बारावे येथील वळण रस्त्यावरील एक मार्गिका फक्त सायकल चालक, पादचाऱ्यांना धावणे, चालण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे.

शहरातील प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ असावे या विचारातून माझे शहर सुदृढ आरोग्य ही संकल्पना घेऊन राबविण्यात येणाऱ्या विशेष योजनेचा शनिवारी पहाटे पाच वाजता आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, त्यांच्या पत्नी व्यवस्थापन सल्लागार डॉ. आरती सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक महेश तरडे, सचिव संजय जाधव, उपायुक्त धर्येशील पाटील, साहाय्यक आयुक्त अतुल पाटील, उपअभियंता रोहिणी लोकरे, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. “शहरातील प्रत्येकात चालण्याची आवड निर्माण व्हावी. सायकल संस्कृती रुजावी. तरूणांपासून ते ज्येष्ठापर्यंत प्रत्येकाने शहरांतर्गत सायकलाचा वापर केला तरी इंधन बचत, प्रदूषणाला आळा आणि वाहन कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे यश पाहून शहरातील इतर रस्ते सायकल मार्गिकेसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.”, असं आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं.

कल्याण, डोंबिवलीतील सायकलपटू, प्रभात फेरीसाठी बाहेर पडलेले तरूण, महिला, पुरूष रहिवासी या उपक्रमात सहभागी झाले होते. शहरातील प्रदूषण कमी व्हावे. वाहन कोंडी कमी व्हावी. शहरांतर्गत आणि शक्य झाल्यास २५ ते ३० किलोमीटरपर्यंत कार्यालयापर्यंतचे अंतर सायकलने पार करण्याची हौस प्रत्येकात निर्माण व्हावी. विद्यार्थी, तरूणांमध्ये सायकल चळवळ रुजवावी, या विधायक हेतून आयुक्तांनी कल्याण, डोंबिवलीतील सायकल क्लब सदस्यांच्या मागण्यांवरून ९० फुटी रस्त्यावर, गांधारे येथे सायकल, धावण्यासाठी विशेष मार्गिका उपलब्ध करून दिल्या आहेत. दररोज पहाटे पाच ते सकाळी आठ वाजेपर्यंत या मार्गिका फक्त सायकलपटू, पादचाऱ्यांसाठी उपलब्ध असतील. या रस्त्यांच्या एका मार्गिकेतून वाहनांची येजा सुरू असेल, असे नियोजन वाहतूक विभागाने केले आहे. ९० फुटी रस्त्यावर म्हसोबा चौक ते पत्रीपूल, गांधारे-बारावे येथे दोन किमीच्या मार्गिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनेक वर्षानंतर प्रथमच सायकलसाठी विशेष मार्गिका पालिकेने उपलब्ध करून दिल्याने सायकल पटू, रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

रविवारी पहाटे पाच वाजता कल्याण, डोंबिवलीतील सायकल क्लबचे सदस्य एकत्रितपणे दोन्ही विशेष मार्गिकांमध्ये सायकल चालविणार आहेत. कल्याणचे सायकल पटू डोंबिवलीतील ९० फुटी रस्त्यावर, डोंबिवलीचे सायकल पटू कल्याणमधील गांधारे येथील रस्त्यावर सायकल चालविणार आहेत. पत्रीपूल येथे एक छोटेखानी कार्यक्रम केला जाणार आहे. रविवारी सुट्टी असल्याने अधिक संख्येने सायकलपटू, रहिवासी या उपक्रमात सहभागी होतील, अशी माहिती डोंबिवली सायकल क्लबचे डॉ. सुनील पुणतांबेकर यांनी दिली.