अनधिकृत बांधकामांची पाठराखण भोवणार
बेकायदा बांधकामांशी संबंधित अनेक नगरसेवक पालिकेत पुन्हा नव्याने निवडून आले आहेत. अशा नगरसेवकांपैकी किमान पाच नगरसेवकांनी नगरसेवक पदाची शपथ घेतली की, त्यांना तात्काळ अपात्र ठरवण्याची कारवाई पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याचे समजते. तसे संकेत यापूर्वीच पालिका प्रशासनाने दिले आहेत.
शिवसेना, भाजप, काँग्रेसमधील नगरसेवकांचा या गच्छंतीमध्ये समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या नगरसेवकांचा बेकायदा बांधकामांशी संबंध असल्याच्या सर्व कागदोपत्री प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केल्या आहेत. काहींना यापूर्वीच नोटिसा देण्यात आल्या आहेत. मोठय़ा हिमतीने, सर्व शक्ती पणाला लावून निवडून आलेले हे नगरसेवक बेकायदा बांधकामांमुळे नगरसेवक पद रद्द होते की काय, या भीतीने चिंताग्रस्त आहेत. कारवाई टाळण्यासाठी त्यांचे हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. आयुक्त रवींद्रन यांच्याकडे डाळ शिजत नसल्याने चिंतेच्या भोवऱ्यात हे नगरसेवक अडकले आहेत.
बेकायदा बांधकामांमुळे नगरसेवक पद रद्द झालेल्या नगरसेवकांच्या प्रभागात सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणुका घेण्यात येतील, असे सूत्राने सांगितले. या कारवाईत शिवसेनेच्या सोनेरी टोळीतील एका बाहुबली नगरसेवकाचा समावेश असणार असल्याचे समजते.

महापौर होण्यास इच्छुकाला पत्र भोवणार
महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या एका नगरसेवकाने पालिकेला काही बेकायदा चाळींना कर लावावा म्हणून प्रशासनाला पत्र दिले होते. या पत्राची प्रत काही जागरूक मंडळींकडे उपलब्ध आहे. त्यामुळे महापौर पदासाठी गळ टाकून असलेला हा उमेदवार महापौर पदाची वरमाला गळ्यात पडताच अडचणीत येऊ शकतो, असे एका जाणत्याने सांगितले.