अटक आरोपींची एकूण संख्या दहा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणाशी संबंधित पाच भूमाफियांना बुधवारी सकाळी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने अटक केली. मुकुंद मिलिंद दातार, सुनील बाळाराम मढवी, रजत राजन, आशु लक्ष्मण मुंगेश, राजेश रघुनाथ पाटील अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या पाचजणांच्या अटकेमुळे आता अटकेत असलेल्या आरोपींची संख्या १० इतकी झाली आहे. काही भूमाफिया अटकेची कारवाई टाळण्यासाठी मुरबाड, शहापूर, सांगली, सातारा भागातील शेतघरात लपून बसले असल्याचे सुत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : गुवाहाटीला जाणार का? या प्रश्नावर CM शिंदेंनी दिलं उत्तर; वाचा राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

 डोंबिवलीतील ६५ भूमाफियांच्या विरुध्द वास्तुविशारद याचिकाकर्ते संदीप पाटील यांच्या तक्रारीवरुन सुमारे दोन महिन्यापूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेने मानपाडा, रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे याप्रकरणात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांची व्याप्ती पाहून ठाणे पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथक स्थापन केले. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच जणांचे तपास पथक या बेकायदा बांधकाम प्रकरणाची चौकशी करत आहे. ६५ हून अधिक भूमाफिया, वास्तुविशारद, मध्यस्थ यांचे जबाब तपास पथकाने नोंदवून घेतले आहेत. या माहितीवरुन तपास पथकाने  बांधकामांची बनावट कागदपत्रे तयार करणारे, रेरा प्रमाणपत्र मिळवून देणारे डोंबिवलीतील प्रियांका रावराणे, प्रवीण ताम्हणकर, राहुल नवसागरे, जयदीप त्रिभुवन, कैलास गावडे या मध्यस्थांना यापूर्वी अटक केली आहे. ते न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणात मुकुंद मिलिंद दातार, सुनील बाळाराम मढवी, रजत राजन, आशु लक्ष्मण मुंगेश, राजेश रघुनाथ पाटील या पाच जणांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. या माफियांनी सर्वसामान्य नागरिकांना बेकायदा इमारतीत घर विकून फसवणूक केली आहे. शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडविला आहे. बँकांची कर्जाच्या माध्यमातून फसवणूक केली आहे.

हेही वाचा >>> ठाणे: कोयना बाधितांसाठी यंदाचे वर्षही प्रतिक्षेचे ?

माफियांकडून संभ्रम

भूमाफियांचे जबाब नोंदवून, मध्यस्थांना अटक करुनही माफियांना अटक होत नसल्याने तपास पथका विषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या. जबाब नोंदवून आलेले माफिया, वास्तुविशारद तपास पथकाविषयी बाहेर संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. पोलीस संरक्षण मिळत नसल्याने नाराज झालेल्या याचिकाकर्ते संदीप पाटील यांनीही सोमवारी कल्याण जिल्हा न्यायालयात न्यायालयासमोर जबाब नोंदविला. आपल्या जीविताला धोका आहे. यापुढे शेवटच्या जबाबासाठी राहू की नाही याची मला शाश्वती नसल्याने आपण जबाब देत आहोत, अशी माहिती न्यायालया समोर दिली होती. ‘ईडी’ने दोन दिवस पाटील यांच्या बरोबर पालिका अधिकाऱ्यांची चौकशी केली. ‘ईडी’कडून कोणत्याही क्षणी माफियांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली असताना, बुधवारी सकाळी गुन्हे विभागाच्या तपास पथकाने डोंबिवलीतील पाच माफियांना अटक केली. बनावट इमारत बांधकाम कागदपत्र, सही शिक्के तयार करणाऱ्या माफियांचा यात समावेश आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five land mafia arrested in illegal construction scam in dombivli arrested accused ysh
First published on: 23-11-2022 at 19:14 IST