डोंबिवली – डोंबिवली जवळील निळजे गाव हद्दीतील लोढा हेवन, पलावा भागातील काही रस्ते मुसळधार पावसामुळे जलमय झाले आहेत. काही सोसायट्यांमध्ये पाणी घुसले आहे. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या हातगाडी, टपरी चालकांची सामुग्री वाहून गेली आहे. वाहून जाणारे सामान पकडण्यासाठी विक्रेत्यांची धांदल उडाली आहे.

निळजे लोढा हेवन भागातील रस्ते सकाळपासून जलमय झाल्याने रहिवाशांना घराबाहेर पडता आले नाही. शाळा, कार्यालयांना सुट्टी असल्याने नागरिक, विद्यार्थी घराबाहेर पडले नाहीत. लोढा हेवनमधील रस्त्यांवर दुतर्फा बाजुने पाणी साचले आहे. हे पाणी अनेक सोसायट्यांच्या आवारात घुसले आहे. त्यामुळे आवारातील मोटारी, दुचाकी वाहने पाण्याखाली बुडाली आहेत.

लोढा हेवन भागात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतील विक्रेते मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर आपले ठेले, हातगाड्या, टपऱ्या उभारून व्यवसाय करतात. सकाळपासून मुसळधार पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर दुपारच्या वेळेते बाजारपेठेतील अनेक विक्रेत्यांची सामुग्री वाहून गेली. यामध्ये हातगाड्या, पाणीपुरीच्या गाड्या, टपऱ्या यांचा सर्वाधिक समावेश होता.

रस्त्यावर अनेक ठिकाणी झाकणे सुस्थितीत नसल्याने पुराच्या पाण्यात अडकून पडू या भीतीने कोणीही रहिवासी घराबाहेर पडला नव्हता. लोढा हेवनमधील वसाहतीत शुकशुकाट होता. भटके श्वान इमारती, हातगाड्या, उंच ठिकाणांचा आधार घेऊन बसले आहेत.

मलंगगड डोंगर भागातून येणारे पावसाचे पाणी पूर्वीपासून देसाई खाडीतून पलावा वसाहत उभारलेल्या भागातून वाहून जात होते. या भागात आता नागरी वसाहती उभ्या राहिल्या. अनेक ठिकाणचे पाण्याचे प्रवाह बदलले. काही ठिकाणी नैसर्गिक नाल्यांचे मार्ग बंद झाले. हे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने मुसळधार पाऊस सुरू झाला की पलावा परिसर, काटई, बदलापूर रस्ता, कल्याण शिळफाटा रस्ता परिसर मागील पाच ते सहा वर्षापासून जलमय होत आहेत. शिळफाटा रस्ता भागात नागरी वसाहती उभ्या राहण्यापूर्वी मुसळधार पाऊस सुरू झाला तरी या भागातील नैसर्गिक नाल्यांमधून पाणी थेट देसाई खाडी, उल्हास खाडीच्या दिशेने वाहून जात होते. आता हे मार्ग जागोजागी बंद झाले आहेत, असे रहिवासी गजानन पाटील यांनी सांगितले.

शिळफाटा रस्ता काँक्रीटचा झाला आहे. या रस्त्याला मोजक्याच ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी भुयारी नलिका आहेत. तसेच या रस्त्याला अनेक ठिकाणी गटारे नाहीत. मुसळधार पाऊस सुरू झाला की पावसाचे पाणी आणि मलंगगड भागातून वाहून येणारे पाणी असा संगम शिळफाटा भागात होऊन हा परिसर अतिवृष्टीच्या काळात जलमय होत आहे, अशी माहिती रहिवासी नरेश पाटील यांनी दिली.