ठाणे : घोडबंदर मार्गावरील महत्त्वाच्या वाघबीळ पुलावर मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम रविवारी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु आहे. त्यामुळे वाघबीळ पुल तीन तासांसाठी बंद करण्याचा निर्णय ठाणे वाहतुक पोलिसांनी घेतला. त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावरील वाहतुक व्यवस्थेवर बसला असून घोडबंदर मार्गावर वाघबीळ ते मानपाडापर्यंत वाहतुक कोंडी झाली. त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे प्रवासावेळी हाल झाले.
ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या घोडबंदर मार्गावरून हजारो हलकी वाहने तसेच उरण जेएनपीटी, भिवंडी येथून सुटणारी अवजड वाहने वसई, गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. याच मार्गावर मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली) आणि चार अ (कासारवडवली ते गायमुख) या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अडथळे बसविण्यात आले असून त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो. गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुक कोंडीचा जाच नागरिकांना सहन करावा लागत आहे.
उड्डाणपूलांची स्थिती
– घोडबंदर मार्गावर वाहतुकीसाठी मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ, कासारवडवली आणि नागलाबंदर ही महत्त्वाची उड्डाणपूल आहेत. यातील कासारवडवली आणि नागलाबंदर उड्डाणपूल याच वर्षी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उभारली आहेत. तर, पातलीपाडा, वाघबीळ आणि मानपाडा उड्डाणपूल जुनी असून त्यांच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते.
वाघबीळ पुलावर भलामोठा खड्डा
– वाघबीळ उड्डाणपूलावर एक मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्याचे छायाचित्र काही दिवसांपूर्वीच समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते. घोडबंदर मार्गाच्या परिस्थितीविषी नागरिकांकडून टीका होऊ लागली होती. हा खड्डा इतका मोठा होता की, खड्ड्यामुळे रस्त्याच्या सळया देखील दिसत होत्या.
खड्ड्याची दुरुस्ती, कोंडीचा त्रास
– या खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम रविवारी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले. दुरुस्ती कामामध्ये वाहतुकीचा अडथळा येऊ नये यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी वाघबीळ उड्डाणपूलावरील मार्गिका वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केली. वाघबीळ पुलावरील वाहतुक बंद झाल्याने पुलाखालील मार्गिकांवर वाहतुकीचा ताण आला होता. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर बसला. रविवारी रात्री वाघबीळ ते मानपाडा पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. तसेच घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवरही कोंडी झाली होती.