नमुन्यांच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष पथके
गणेशोत्सवाच्या हंगामात मिठाईत वापरल्या जाणाऱ्या भेसळयुक्त माव्याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने यंदा गणेश मंडळांतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद तसेच भंडारा कार्यक्रमांमधील अन्नपदार्थाच्या तपासासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. पाच, सात आणि दहा दिवसांच्या उत्सवांमध्ये विसर्जन दिवसाच्या दोन दिवस अगोदर अनेक मंडळांतर्फे महाप्रसादासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
ठाणे तसेच उल्हासनगर शहरात यंदा महापालिका निवडणुकीची धामधूम असल्याने प्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदारांना खूश करण्याचे प्रयत्नही जागोजागी सुरू झाले आहेत. त्यामुळे अशा एखाद्या भंडारा उत्सवातून नागरिकांना अन्नातून विषबाधा होऊ नये, यासाठी यासंबंधीची सविस्तर माहिती अन्न व औधष प्रशासनास देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणचे अन्नाचे नमुने तपासण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांत ठाणे जिल्ह्य़ातील ३०-४० मंडळांची तपासणी करण्यात आली आहे. या वेळी प्रसादाचे काही नमुने घेण्यात आले आहेत. या तपासणीत एकही मंडळ दोषी आढळलेले नाही. शिवाय मंडळाच्या आजूबाजूला असणाऱ्या मिठाईच्या दुकानावरही करडी नजर ठेवण्यात आली आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली. तसेच नागरिकांनाही काही त्रास झाला तर १८००२२२३६५ या महाराष्ट्रभर टोल फ्री असणाऱ्या क्रमांकावर ग्राहकांनी तक्रार करावी, असे आवाहनही अन्न व औषध विभागाने केले आहे.
प्रशासनाची नियमावली
* सार्वजनिक गणेश मंडळाने प्रसाद वाटपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करताना अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी आवश्यक आहे.
* प्रशासनाकडून देण्यात येणारे नोंदणी प्रमाणपत्र प्रसादाचे वाटप होईल, अशा दर्शनी भागात ठेवावे.
* अन्न किंवा महाप्रसाद वाटताना स्वच्छता आहे की नाही याची पाहणी होणार.
* प्रसादासाठी लागणारा कच्चा माल अन्न पदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच खरेदी करावा तसेच जेवण बनविणाऱ्यांची माहिती अद्ययावत ठेवावी.
* कच्चे तसेच सडलेल्या फळांचा वापर करू नये. प्रसाद वाटप करणाऱ्या व्यक्तीने चमचा किंवा हातमोजे घालूनच प्रसाद वाटावा, असे काही नियम पाळणे बंधनकारक आहे.
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळामध्ये महाप्रसादाचे आयोजन होते.या महाप्रसादातून कोणतीही विषबाधा होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून १० पथकांची नेमणूक केली आहे. हे गट सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाची पाहणी करणार असून अन्नामध्ये भेसळ आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
– सुरेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन, सहाय्यक आयुक्त.