ठाणे: घोडबंदर येथील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मागील काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. या कामासाठी मंगळवारपर्यंत मुदत होती. परंतु या मुदतीत काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने १ मे पर्यंत मुदत पोलिसांकडे मागितली होती. ही मुदतवाढ वाहतुक पोलिसांनी दिलेली आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस गायमुख घाटातील कोंडीचा मन:स्ताप प्रवाशांना सहन करावा लागणार आहे.
उरण जेएनपीटी बंदर, भिवंडी येथून हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे गुजरात, वसईच्या दिशेने वाहतुक करत असतात. तसेच बोरीवली, मिरा भाईंदर, वसई, विरार भागात वाहतुक होणारी हलकी वाहने, परिवहन सेवेच्या बसगाड्या देखील वाहतुक करत असतात. येथील गायमुख घाट अत्यंत अरुंद आहे. तसेच दर पावसाळ्यात या रस्त्याची अक्षरश: चाळण होत असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या घाट मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. शनिवारपासून (२६ एप्रिल) या मार्गिकेवर दुरुस्तीचे काम सुरु झाले होते.
मंगळवार (२९ एप्रिल) पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती पूर्ण करण्यासाठी मुदत मागितली होती. त्यानुसार, ठाणे पोलिसांनी मंगळवारपर्यंत वाहतुक बदल लागू केले होते. हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आणखी दोन दिवस म्हणजेच, १ मे पर्यंत मुदत मागितली होती. ही मुदत वाहतुक विभागाला द्यावी लागणार आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम वाहतुक व्यवस्थेवर बसणार आहे.
सद्यस्थितीत काय होत आहे- या कामामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेशबंदी लागू केली आहे. अवजड वाहनांचा ताप घोडबंदरमधील रहिवाशांना कमी झाला असला तरी, गायमुख घाटात टप्प्याटप्प्याने वाहतुक सोडली जात आहे. त्यामुळे घाट परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे.
अनेकदा गायमुख घाट ते फाऊंटन हाॅटेलपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहे. वसई, विरार, बोरीवली, मिरा भाईंदर भागातून ठाण्यात ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना फटका बसत आहे.मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका परिसरातून अवजड वाहनांना बदल लागू केल्याने मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका ते दापोडे पर्यंत वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला १ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुक बदल १ मे रात्री ११.५५ वाजेपर्यंत लागू असतील. – जितेंद्र राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कासारवडवली वाहतुक पोलीस.चौकटसिमेंट ग्राउटेड बिटुमिनस मिक्स (सीजीबीएम) या पद्धतीने गायमुख घाटाचे काम केले जात आहे. आयआयटीच्या तज्ज्ञांच्या अहवालानंतर हे काम सुरू झाले आहे. याठिकाणी डांबरी रस्ता तयार केला जाणार आहे.