मुंगुस हा शुभ प्राणी मानला जातो. तो दररोज दिसला तर दिवस चांगला जातो आणि धनप्राप्ती होते या अंधश्रद्धेतून डोंबिवलीतील एका व्यावसायिकाने चार मूंगुस आपल्या घराच्या दारातील पिंजऱ्यात डांबून ठेवले होते. त्यांचे तो संगोपन करत होता. याविषयी वन विभागाला माहिती मिळताच वन विभागाच्या भरारी पथकाने व्यावसायिकाच्या घरी छापा टाकला. चारही मूंगुस ताब्यात घेऊन व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई केली.
विठ्ठल जोशी अशी कारवाई झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ते जुनी डोंबिवलीतील शास्त्रीनगर भागात गणेश स्मृति इमारतीत राहतात. मुंगसाचा चेहरा दररोज सकाळी बघितला तर दिवस चांगला जातो, त्याच बरोबर धनप्राप्ती होते, अशी विठ्ठल जोशी यांची अंधश्रद्धा होती. या अंधश्रद्धेमधून त्यांनी चार मूंगुस जंगलामधून पकडून आणले होते. हे चारही मुंगूस एक पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवण्यात आले होते. या मूंगसांची खाण्याची चांगली बडदास्त विठ्ठल यांनी ठेवली होती. मूंगुस हा जंगली वन्यजीव आहे. त्याला बंदिस्त करून मालक काय साध्य करत आहे, असे प्रश्न या भागातील रहिवासी करत होते. त्यांना त्यांच्या मोकळ्या वातावरणात सोडून द्यावे अशी रहिवाशांची मागणी होती.




याविषयीची माहिती काही जागरूक रहिवाशांनी वन विभागाला दिली. वन विभागाच्या पथकाने खात्री केल्यानंतर विठ्ठल जोशी यांच्या घरी छापा टाकला. घराच्या दारात पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवलेले मूंगुस ताब्यात घेतले. विठ्ठल जोशी यांच्यावर कायदेशीवर कारवाई करण्यात आली आहे, असे वन अधिकाऱ्याने सांगितले.
जंगली अधिवास हा वन्यजीवांचा मुख्य निवारा आहे. वन्यजीवांची मोठी साखळी एकमेकांवर अवलंबून असते. त्यामुळे असे जंगली प्राणी घरात आणून पाळीव म्हणून ठेवणे योग्य नाही. वाघ, सिंह, हरीण, ससा, नीलगाय, तरस, भेकर, मुंगूस असे अनेक प्राणी संरक्षित वन्यजीव आहेत, असे वनाधिकाऱ्याने सांगितले.
“मुंगूस हा संरक्षित वन्यजीव आहे. मुंगसाला बंदिस्त करून ठेवणे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे विठ्ठल जोशी यांच्यावर मूंगुस बंदिस्त करून ठेवल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे,” अशी माहिती कल्याणमधील वनाधिकारी एम. डी. जाधव यांनी दिली आहे.