भारतीय टपाल सेवेच्या कार्यालयात आलेल्या विविध बँकांच्या ग्राहकांचे डेबिट कार्ड घेऊन त्या कार्डच्या आधारे, नागरिकांच्या बँक खात्यातील सुमारे पाच लाख रुपये काढून बँक आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या मोहम्मद तोहीद मोहम्मद आजिम शेख (२२) याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. मोहम्मद तोहीद हा चार महिने भारतीय टपाल सेवेत कंत्राटी काम करत होता. काम सोडण्यापूर्वीच त्याने ८६ ग्राहकांचे डेबिट कार्ड घरी पाठविण्याऐवजी स्वत:जवळ ठेवून घेतले होते. ग्राहकांच्या पैशांतून त्याने एक कारही खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून १६ ग्राहकांच्या खात्यातील पैसे अचानक गायब होत असल्याच्या तक्रारी एका खासगी बँकेकडे येत होत्या. त्यामुळे संंबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तर, याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट पाचकडून सुरू होता. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने याप्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला असता, ज्या ग्राहकांच्या खात्यातून पैसे गायब झाले आहेत. त्यांनी डेबिट कार्डसाठी अर्ज केले होते. परंतु त्यांना कार्ड मिळाले नव्हते. अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खबऱ््यांमार्फत माहिती काढली असता, हे कृत्य भारतीय टपाल सेवेतील एका माजी कंत्राटी कर्मचाऱ्याने केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी मुंब्रा येथील कोळीवाडा भागातून मोहम्मद तोहीद या माजी कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून विविध खासगी आणि सरकारी बँकांचे ८६ डेबिट कार्ड आणि एक कार जप्त केली आहे.

अनेकदा बँक ग्राहक डेबिट कार्डसाठी बँकांकडे अर्ज करत असतात. त्यामुळे या बँका भारतीय टपालाद्वारे ग्राहकांना डेबिट कार्ड आणि त्यांसदर्भाच्या माहितीचा तपशील पाठवित असतात. मोहम्मद तोहीद हा २०२१ मध्ये जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत भारतीय टपाल विभागाच्या कोर्टनाका शाखेत कार्यरत होता. मोहम्मदकडे आलेले डेबिट कार्ड ग्राहकांना पाठविण्याऐवजी तो स्वत:कडे ठेऊन दिले. नोकरी सोडल्यानंतर त्याने डेबिट कार्डसोबत असलेल्या ग्राहकांच्या तपशीलाच्या आधारे त्यांना संपर्क साधण्यास सुरूवात केली. बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगून तो ग्राहकांचे डेबिट कार्ड कार्यान्वित करत होता. डेबिट कार्ड कार्यान्वित झाल्यानंतर आरोपी त्यांच्या कार्डच्या आधारे, एटीएम केंद्रात जाऊन पैसे काढत होता. त्याने आतापर्यंत १६ ग्राहकांच्या खात्यातून पाच लाख रुपयांची रोकड काढल्याचे समोर आले आहे. तसेच या पैशांतून एक महागडी कारही खरेदी केली आहे. पोलिसांनी इतरही बँकांना संपर्क साधून अशाप्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांचा तपशील मागविला आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या बँक ग्राहकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.