डोंबिवली : डोंबिवलीतील काँग्रेसचे मुख्य आधारस्तंभ असलेले काँँग्रेसचे चार माजी ज्येष्ठ नगरसेवकांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीतील काँग्रस पक्षाला खिंडार पडले आहे. मागील दोन वर्षांपासून या नगरसेवकांची काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली होती. या नगरसेवकांना विविध पक्षांकडून आपल्या पक्षात येण्यासाठी गळ घातली जात होती. काँग्रेसच्या या ज्येष्ठ नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्यात भाजपला यश आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरूवारी या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

डोंबिवलीतील काँग्रेसमधील भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये ज्येष्ठ नगरसेवक जितेंद्र भोईर, माजी ज्येष्ठ नगरसेवक नंदू म्हात्रे, माजी ज्येष्ठ नगरसेवक हदयनाथ भोईर, माजी नगरसेविका हर्षदा हदयनाथ भोईर, टिटवाळ्याचे माजी नगरसेवक बुधाराम सरनोबत, शैलेंद्र भोईर, सदानंद म्हात्रे आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, कल्याण जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, राहुल दामले, मंदार हळबे उपस्थित होते.

डोंबिवलीतील निष्ठावान कार्यकर्ते म्हणून या माजी नगरसेवकांची ओळख आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते सुदाम भोईर, माजी उपमहापौर पंडित भोईर यांच्या कुटुंबातील हदयनाथ भोईर, हर्षदा भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या निष्ठावान काँग्रेस नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने डोंबिवली काँग्रेसला खिंडार पडले आहे. या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दहा दिवसापूर्वी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी नगरसेवक राहुल दामले यांच्या उपस्थितीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर एक बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करून भाजपने या माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश दिल्याची चर्चा आहे.

‘भाजपमध्ये दाखल झालेल्या या नगरसेवकांशी आपले जुने कौटुंबिक संबंध आहेत. विकासासाठी काँग्रेसचे असुनही त्यांनी कल्याण डोंबिवलीतील सर्व विकास कामांच्या विषयावर पालिकेतील ठरावांना नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळे निरपेक्ष भावनेतून काम करणाऱ्या या नगरसेवकांचा भाजपमध्ये नेहमीच सन्मान केला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.

‘काँग्रेस म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजे काँग्रेस असेच डोंबिवलीतील चित्र होते. मागील काही वर्षाचा विचार केला तर प्रभागातील नागरी विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी, लोकांची कामे करण्यासाठी पक्ष बदल आवश्यक वाटू लागला होता. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. यापूर्वी आम्ही काँग्रेसमध्ये होतो तरी आम्हाला विकास कामांसाठी सर्वाधिक निधी देण्याचे काम यापूर्वीपासून भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी केले आहे,’ असे माजी नगरसेवक जितेंद्र भोईर यांनी मनोगतात सांगितले.

जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढविण्यासाठी मित्र पक्षाचा सन्मान राखून असे पक्ष प्रवेश ही काळाची गरज आहे, असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. अतिशय निष्ठावान मंडळींनी भाजपमध्ये आज प्रवेश केला. त्यांचा अनुभव, त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामाचा नक्कीच भाजपलाही लाभ होईल. या नगरसेवकांचे विकास, नागरी समस्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप नेहमीच तत्पर असेल, असे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी सांगितले.