ज्ञानसाधनामध्ये अभ्यासाबरोबरच आवडीच्या अभिनय कलेचे धडे गिरविणाऱ्या चार मित्रांनी ‘फोर्थ वॉल’ या संस्थेच्या माध्यमातून नाटय़कलेचा छंद कायम ठेवला. त्यातून निरनिराळ्या कल्पक एकांकिकांची निर्मिती झाली. महाविद्यालयीन नाटय़ वर्तुळात त्यांची बरीच चर्चा झाली. ‘मित्तर’ त्यापैकीच एक..

‘बंदुकीचा चाप ओढला की गोळी सुटते, प्रश्न नाही’’ सदाच्या तोंडातून हे वाक्य ऐकताच त्या नक्षलवादी मुलीच्या अर्थात दुर्गीच्या मनाला आपण जे करतोय तो मार्ग खरंच बरोबर आहे किंवा नाही असा प्रश्न पडला. नक्षलग्रस्त भागात लहानाची मोठी झालेल्या दुर्गीवर दास बाबाचा खूप प्रभाव होता व याच विचाराने तिने नक्षलवाद स्वीकारला होता. दासबाबा हा अत्यंत अचूक पद्धतीने गोळीबार करणारा, धावण्यात तरबेज आणि अगदी हुशार असा तरुण नक्षलवादी होता, जो कधीच पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. एके दिवशी पोलीस मागे लागल्यावर तो पोलिसांना चुकवून जंगलात पळून गेला, जो कधी परत आलाच नाही. त्याचा तो पराक्रम पाहून आपणही दासबाबासारखं काहीतरी आयुष्यात करून दाखवायचं असं दुर्गीने मनोमन ठरवलं. एकदा  पोलिसांपासून वाचण्यासाठी दुर्गी एका घरात शिरली. त्या घरात सदा नावाची एक ५० वर्षांची व्यक्ती आणि त्याच्याकडे पाहुणे म्हणून आलेले दोन पत्रकार असतात. पत्रकारांनी आवाज केल्यावर त्यांच्यावर दमदाटी करून दुर्गीने त्यांना शांत केलं. ते गेल्यावर सदाने दुर्गीला विश्वासात घेऊन तिच्याशी संवाद साधला. दुर्गीला नक्षलवाद का भावला, तिने बंदूक नेमकी का हाती घेतली, हे सारे तपशील त्यातून उलगडत गेले. सदा आणि दुर्गी या दोन भिन्न व्यक्तिमत्त्वांमधील संवादातून नक्षलवाद, त्याची कारणे, आहे रे आणि नाही रे वर्गातील संघर्ष, सदोष व्यवस्थेमुळे समाजातील मोठय़ा घटकांवर होणारा अन्याय हे सारे मुद्दे मांडले जातात. आतापर्यंत एकतर्फी विचार करणारी दुर्गी सदाच्या युक्तिवादाने प्रथमच संभ्रमात पडते. सदा नामक व्यक्ती नेमकी कोण आहे व ती या पद्धतीचा विचार कशी करू शकते, याचे कुतूहल एकांकिकेच्या शेवटापर्यंत कायम राहते. हा सदा नेमका कोण असतो? दास बाबा या नक्षलवादी तरुणाचे पुढे काय होते? दुर्गेचा नक्षलवाद संपतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे उलगडण्यासाठी ठाण्यातील ‘फोर्थ वॉल’ या संस्थेची ‘मित्तर’ ही एकांकिका नक्कीच पाहण्यासारखी आहे.

ठाण्यातील ज्ञानसाधनामध्ये अकरावीला असणाऱ्या आशुतोष बावीस्कर, सागर सकपाळ, उमेश ढोबळे आणि मोहन बनसोडे यांनी अभिनयाची आवड असल्यामुळे महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ‘नाटय़मय’ संस्थेमध्ये प्रवेश घेतला. ‘वर्क इन प्रोग्रेस’ या पहिल्या एकांकिकेत त्यांनी भाग घेतला. पुढील दोन र्वष त्यांनी एकामागोमाग एक एकांकिका केल्या. पुढेही असेच एकत्र काम करत राहायचे या विचाराने वरिष्ठ महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षांत या चार मित्रांनी मिळून ‘फोर्थ वॉल’ नावाची संस्था सुरू केली. रंगमंचाच्या चौथ्या भिंतीसमोर कला सादर करत असल्याने आणि चार मित्रांनी सुरू केलेली संस्था म्हणून संस्थेचे नाव ‘फोर्थ वॉल’ असे ठेवण्यात आले. ‘अशाही संध्याकाळी’ ही २०१० साली या संस्थेने सादर केलेली पहिली एकांकिका होती. कुठलेच आर्थिक पाठबळ नसतानाही पुढील तीन वर्षांत संस्थेने एकांकिकेचे प्रयोग सादर करणे सुरूच ठेवले. पारितोषिके मिळत गेली. यथावकाश तरुणांचा पदवी अभ्यासक्रमही पूर्ण झाला. आशुतोषने महाविद्यालयात दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान मोहन एकांकिका लिहू लागला. ‘आगंतुक’ ही आशुतोषने दिग्दर्शित केलेली पहिली एकांकिका. तर मोहनने ‘टप्पा’ नावाची पहिली एकांकिका लिहिली. पुढे एक प्रयोग संधीचा, रात्रीस खेळ चाले अशा अनेक एकांकिका गेल्या पाच वर्षांत या दोघांनी मिळून बसवल्या होत्या व अनेक  स्पर्धामध्ये पारितोषिकेही पटकावली. २०१५ मध्ये भरवल्या गेलेल्या मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव स्पर्धेत ‘अशील’ या एकांकिकेला दुसरं पारितोषिक व सर्वोत्तम अभिनेता आणि सर्वोत्तम अभिनेत्रीचे पारितोषिक मिळालं. युवा महोत्सवातील यशाने त्यांचा आत्मविश्वास आणि हुरूप वाढला आणि पुढे मानाच्या आयएनटी स्पर्धेत एकांकिका सादर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. आशुतोषच्या मनात खूप दिवसापासून एक संकल्पना होती, जी त्याने मोहनला एकांकिका स्वरूपात लिहून काढण्यास सांगितली. एकांकिका पूर्णपणे लिहून झाल्यावर ओमकार जयवंत यांने दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली. प्रकाश योजना व संगीत नितेश पाताडे आणि गौरव कांदे यांनी करण्याचे ठरवले व ‘मित्तर’ या एकांकिकेचा प्रवास सुरू झाला. मनीष साठे याने सदा हे पात्र आणि पूजा कांबळे हिने दुर्गी हे पात्र सादर केले. त्यांच्यासोबत प्रफुल्ल गुरव, निकिता घाग, सुरज घोरपडे, महेश पाटील, रविराज वानखेडे, कल्याणी साकळूनकर, स्वप्निल झोमबाडे, दिशांत जाधव, मिशा, सागर देवरे आणि कुणाल गजभरे अशा अनेक कलाकारांनी साथ दिली व ‘फोर्थ वॉल’ संस्थेतर्फे ‘मित्तर’ ही एकांकिका आयएनटी स्पर्धेत सादर झाली. २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांत संस्थेने १५ पेक्षा अधिक स्पर्धेत ‘मित्तर’ एकांकिका सादर केली आहे. कुणाचेही पाठबळ नसताना पदरमोड करून त्यांनी एकांकिका सादर केली. त्यांना अनेक मोठय़ा रकमेची पारितोषिके मिळाली. सध्या संस्थेची वाटचाल या वर्षीच्या आयएनटीच्या स्पर्धेसाठी सुरू आहे. ‘फोर्थ वॉल’ संस्था लवकरच त्यांच्या तीन एकांकिकांचा ‘युथवॉल’ हा महोत्सव साजरा करणार आहे. ठाण्यातील जवळच्या नाटय़गृहात हा महोत्सव पाहण्याची संधी रसिकांना मिळू शकणार आहे.