कल्याण- कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील मे. रामदेवबाबा डेव्हलपर्स ॲन्ड बिल्डर्स कंपनीने मुरबाड तालुक्यातील मोहरई येथे ८०७ भूखंड विकसित करण्याचा बंगले प्रकल्प सुरू केला होता. डोंबिवली, कल्याण, मुंबई भागातील अनेक नागरिकांनी याठिकाणी विकासकांकडून देण्यात येणाऱ्या सुविधा पाहून एकूण १० लाख रुपये किमतीला भूखंड खरेदी केले. सात वर्षात विकासकाने दिलेल्या शब्दाप्रमाणे क्लब हाऊससह कोणत्याही सुविधा भूखंडांच्या ठिकाणी न दिल्याने एका वकिलाने विकासका विरुध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ॲड़. विद्याधर विनायक गांगुर्डे (रा. ४५, पाटीदार संकुल, कन्नमवार नगर, विक्रोळी पूर्व, मुंबई) असे तक्रारदाराचे नाव आहे. ॲड. गांगुर्डे यांच्याप्रमाणे डोंबिवलीतील सचिन गवळी, मंगेश म्हापसेकर, गोपाळ मुगणगेकर, कळवा येथील उदय नांदेडकर, कल्याणचे किशोर पौनीकर यांचीही फसवणूक झाली आहे. रामदेवबाब डेव्हपर्सचे संचालक मोहन चांडक (रा. बस स्थानका समोर आर्वी, ता. आर्वी, जि. वर्धा), गोपाळ चांडक (रा. आर्वी), गणेश लाहोटी (रा. जैन मंदिरा जवळ, मुक्ताईनगर, जळगाव) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार ॲड. गांगुर्डे यांनी नऊ वर्षापूर्वी रामदेवबाब विकासकाची जाहिरात पाहिली. भूखंड खरेदीपूर्वी त्यांनी खडकपाडा येथील विकासकाच्या कार्यालयात जाऊन माहिती घेतली. विकासक तुषार लाहोटी, गणेश लाहोटी, प्रवीण भुतडा यांनी मोहरई येथील भूखंडांच्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या पाणी, क्लब हाऊस, तरणतलाव, मंदिर, शाळा, जीमखाना, मलजलनिस्सारण सुविधांची माहिती दिली. भूखंड, परिसर आवडल्याने ॲड. गांगुर्डे यांनी विकासक मोहन चांडक यांच्याकडून नोंदणीकृत खरेदी व्यवहार करुन तीन लाख ८७ हजार रुपये विकासकाला दिले. १८० चौरस मीटरचा भूखंड आहे.
क्लब हाऊससाठी ॲड. गांगुर्डे यांच्याकडून ७७ हजार ४७२ रुपये वेगळी रक्कम विकासकाने घेतली. अशा विविध सुविधांसाठी तक्रारदार गांगुर्डे यांनी विकासकाला १० लाख ६५ हजार रुपये धनादेशाव्दारे दिले. २०१६ मध्ये हे व्यवहार झाले. एक वर्षात प्रकल्प विकसित करुन ताबा देण्याचे आश्वासन विकासकांनी गांगुर्डे यांना दिले होते. क्लब हाऊसचे वेगळे दस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
दस्त नोंदणीनंतर सहा महिन्यात गांगुर्डे यांनी मोहरई येथील कामाची प्रगती पाहण्यासाठी भेट दिली. तेथे काही विकसित झाले नव्हते. या सुविधा लवकर दिल्या जातील. भूखंड विकसित होईल असे आश्वासन खरेदीदारांना दिले जात होते. इतर खरेदीदारांनीही आम्हाला विकासकाने सांगितलेल्या सुविधांप्रमाणे कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. फक्त आश्वासन दिली जात आहेत असे गांगुर्डे यांना सांगितले.
विकासकांची उडवाउडवीची उत्तरे ऐकून खरेदीदार संतप्त होते. २०१९ मध्ये विकासकाचे खडकपाडा येथील कार्यालय बंद झाले. मोबाईलवरुन खरेदीदार विकसाकांच्या संपर्कात होते. आम्ही सुविधा देऊ अशी खोटी आश्वासने ते देत होते. अनेक भूखंड खरेदीदार मोहरई येथे येऊन चौकशी करत होते. तेथे काही विकसित झाले नव्हते. एकूण ८०७ भूखंड पडिक असून क्लब हाऊस विकसित करण्यासाठी प्रत्येकाकडून विकासकाने ६५ ते ८० हजार रुपये घेतले आहेत अशी माहिती गांगुर्डे यांना मिळाली.
मोहरई येथील भूखंड विकसित होण्याची कोणतीही खात्री नसल्याने रामदेवबाबा कंपनीचे संचालक आपली व इतर खरेदीदारांची फसवणूक करत आहेत याची जाणीव झाल्याने ॲड. गांगुर्डे यांनी विकसकांच्या विरुध्द पैशाचा अपहार, फसवणुकीची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.