ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र मेळाव्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे माजी आमदार नेते राजू पाटील यांनी एक्स माध्यमावर ट्विट केले आहे. हे ट्विट चर्चेत असून जळजळीवर उपाय म्हणून असलेल्या एका मलमाच्या ब्रँडचा फोटो टाकला आहे. त्यात मराठी भैयांसाठी मोफत असा उल्लेख केला आहे.
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय निर्णय सरकारने रद्द केल्यानंतर विजयी जल्लोष करण्यासाठी आज, मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यानंतर आता राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मनसे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी समाजमाध्यमावर दोन्ही बंधू एकत्र येत असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. तर महायुतीच्या नेत्यांकडून या मेळाव्याविषयी टीका केली जात आहे.
मनसेचे नेते राजू पाटील हे त्यांच्या एक्स माध्यमावरील ट्वीटसाठी नेहमी चर्चेत असतात. मेळावा झाल्यानंतर त्यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये ‘मराठी भैयांसाठी मोफत’ असे म्हटले आहे. तसेच एका जळजळीवरील मलमाचे टेम्पो त्या छायाचित्रात दिसत आहे. या ट्विटला अनेक प्रतिक्रिया मनसे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी देत आहे. तसेच हा ट्विट चर्चेत येत आहे. दरम्यान, टीकेला आता महायुतीचे नेते काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.