घाऊक बाजारात स्वस्त असूनही ग्राहकांची लूट

किन्नरी जाधव, ठाणे</strong>

हिवाळा सुरू झाल्यापासून घाऊक बाजारातील फळांचे दर घसरले असले, तरी किरकोळीत मात्र ही फळे दुप्पट दराने विकली जात आहेत. बारमाही उपलब्ध असणारे आणि ग्राहकांची जास्त मागणी असणारे सफरचंद घाऊक बाजारात ५५ रुपये किलोने उपलब्ध असताना मुंबई, ठाण्याच्या किरकोळ बाजारांत ते १५० ते २०० रुपये किलोने विकले जात आहे. पेरू, पपई, संत्री या फळांसाठीदेखील दुप्पट दर आकारला जात आहे. त्यामुळे फळबाजारात स्वस्ताई अवतरली असली, तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिवाळा सुरू झाल्यामुळे बाजारात विविध हंगामी फळे आली आहेत. आरोग्याच्या दृष्टीने फलाहार महत्त्वाचा असल्याने नागरिकांकडून फळांना मोठी मागणी असते. सध्या घाऊक बाजारातील आवक स्थिर असल्याने फळांचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. तरीही वाहतूक खर्चाचे कारण पुढे करत किरकोळ बाजारातील फळविक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट सुरू आहे. घाऊक बाजारात काश्मीर आणि हिमाचलमधून सफरचंदाची आवक होते. पपई, सीताफळ, डाळिंब, अंजीर, बोरे कर्नाटक आणि महाराष्ट्रातून येतात. या सर्व फळांचे एकत्रितरीत्या दररोज २५० ते ३०० ट्रक घाऊक बाजारात येतात. सध्या सफरचंद, मोसंबी, संत्री या फळांची सर्वात जास्त आवक होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारातील फळांचे दर कमी झाल्याचे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी सांगितले. असे असताना घाऊक बाजारात स्वस्त मिळणारी सफरचंद किरकोळ बाजारात १५० ते २०० रुपयांना विकण्यात येत आहेत. मोसंबी घाऊक बाजारात १६ रुपये किलोने विकण्यात येत असली तरी किरकोळ बाजारात ५० रुपयांना तीन नग विकली जात आहेत. घाऊक बाजारात ३५ रुपये किलोने विकण्यात येणारे चिकू किरकोळीत ५० ते ६० रुपयांना विकले जात आहेत. वाहतूक खर्चाचे कारण देत फळांच्या किमती रोज बदलण्यात येत आहेत, असे किरकोळ बाजारातील विक्रेते सुशांत शहा यांनी सांगितले