रेल्वे स्थानक परिसरात प्रवासी आणि रिक्षाचालक मुखपट्टीविना

ठाणे : करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुखपट्टीसह इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन सातत्याने राज्य शासनाकडून केले जात असले तरी ठाणे शहरातील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या रेल्वे स्थानक परिसरात अनेक जण हे नियम पायदळी तुडवीत असल्याचे दिसून येत आहे.

रेल्वे स्थानक आणि परिसरात अनेकजणांचा वावर मुखपट्टीविना सुरू असून रिक्षाचालक बिनधास्त चार प्रवाशांची वाहतूक करून नियमांचे तीनतेरा वाजवत असल्याचे चित्र आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असे चित्र असतानाही पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याच भागात दिवसागणिक फेरीवाल्यांचा आकडाही वाढत असून त्याकडेही दुर्लक्ष करण्याचा प्रकार सुरूच आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत करोनाचे ३०८ सक्रिय रुग्ण आहेत. शहरात दररोज ३० ते ३५ करोना रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाची लागण झालेले रुग्ण देशात आणि राज्यात आढळून येत आहेत. ठाणे शहरात ओमायक्रॉनचे रुग्ण अद्याप आढळलेले नसले तरी त्याच्या संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे, असा दावा वरिष्ठ अधिकारी करताना दिसतात. राज्य शासनाबरोबरच ठाणे महापालिका प्रशासनाकडून करोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना सातत्याने केले जात   आहे. या आवाहनानंतरही शहराच्या विविध भागात नागरिक मुखपट्टीविना वावरत असल्याचे चित्र दिसून येते. तसेच अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करीत असून यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

रेल्वे स्थानकात बजबजपुरी

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रेल्वे स्थानक परिसरातही नागरिकांसह रिक्षाचालक करोना नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. या निष्काळजीपणामुळे करोनाचा धोका वाढण्याची भीती आहे. मुखपट्टी तसेच करोना नियंत्रणासंबंधी आखण्यात आलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी वेळोवेळी दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र आयुक्तांच्या आदेशाचे महापालिकेचे प्रभाग पातळीवर काम करणारे अधिकारी आणि कर्मचारीच पालन करत नसल्याचे दिसून येत आहे.

ठाणे स्थानक परिसरातून रिक्षाचालक प्रवाशांची वाहतूक करतात. या रिक्षांमधून चारहून अधिक प्रवाशांची बेकायदा वाहतूक केली जात आहे. अनेक रिक्षाचालकांचा मुखपट्टीविनाच स्थानक परिसरात वावर सुरू असतो. मात्र गर्दीच्या वेळा आणि टीएमटी बसथांब्यावरील रांगा पाहून प्रवाशांचाही नाइलाज होत असतो. रेल्वे पोलीस चौकीजवळही रिक्षाचालकांनी बेकायदा थांबा उभारला असून तेथूनच ते प्रवाशांची वाहतूक करतात. मुखपट्टी आणि सुरक्षित अंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांना पालिका सुरक्षारक्षक अडवितात आणि त्यांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना करतात. त्यांच्यावरही काही रिक्षाचालक पालिका अरेरावी करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांसह रिक्षाचालकांनी करोना नियमांचे पालन करायला हवे. या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांच्या मदतीने पालिकेच्या पथकाकडून कारवाई करण्यात येईल.

संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका