अनेकांचा मुखपट्टीविनाच मुक्त संचार; अंतर नियमाकडेही दुर्लक्ष

ठाणे : राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करा, या आवाहनाला ठाणे शहरात अनेक ठिकाणी केराची टोपली दाखवली जात आहे. ठाणे शहरात दुसऱ्या स्तराचे नियम लागू असल्याने पूर्णवेळ बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. त्याचा गैरफायदा काही नागरिकांनी घेतला आहे. शहरातील विविध भागात नागरिक विनामुखपट्टी फिरत आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये सामाजिक अंतर नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. टाळेबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत होती. टाळेबंदी शिथिल होताच ही कारवाई थंडावल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाचा प्रादुर्भाव जून महिन्यात कमी झाल्याने राज्य शासनाने टाळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली. ठाणे शहर दुसऱ्या स्तरावर येत असल्याने या शहरात पूर्णवेळ बाजारपेठा सुरू ठेवण्यास तसेच सार्वजनिक वाहनातून पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. शहरातील बाजारपेठा पूर्णवेळ सुरू झाल्यामुळे या ठिकाणी नागरिक खरेदीसाठी  सकाळ – संध्याकाळ गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. जांभळीनाका बाजारपेठ शहरातील मुख्य बाजारपेठ मानली जाते. या ठिकाणी दुकानदारांसह मोठय़ा संख्येने फेरीवाले बसलेले पाहायला मिळत आहेत. या फेरीवाल्यांच्या तोंडावर अनेकदा मुखपट्टी नसते. तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे या ठिकाणी करोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. मासुंदा तलाव, उपवन, कचराळी तलाव याठिकाणी  नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यावेळी अनेक नागरिकांच्या तोंडावर मुखपट्टी नसते. तसेच शहारातील चौकांमध्ये काही जण विनामुखपट्टी उभे असलेले पाहायला मिळत आहे.

शहरात टाळेबंदीचे नियम लागू असताना ठाणे महापालिकेकडून विनामुखपट्टी फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारण्यात येत होता. आता टाळेबंदीत शिथिलता मिळाली असून शहरात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेकांकडून करोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.

टाळेबंदी शिथिल झाली असली तरी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. टाळेबंदी शिथिलतेनंतरही शहरात विनामुखपट्टी फिरणाऱ्यांवर पालिकेच्या पथकाकडून वारंवार कारवाई करण्यात येत आहे.

– संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fuss rules lockdown relaxed ssh
First published on: 25-06-2021 at 01:51 IST