ठाणे – गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात उत्साहपूर्ण आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे. यंदाही गणेशमूर्तीच्या आगमनासाठी काही आठवडे आधीपासूनच जय्यत तयारी सुरू झाली होती. मंडळात आणि घरगुती प्रतिष्ठापनेसाठी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी आरास करण्यात आली आहे. अशातच गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी मुहूर्त देखील महत्वाचा मानला जातो. यंदा गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी आणि गोरी आवाहनाचा मुहूर्त काय असणार हे ठाण्यातील ज्येष्ठ पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी सांगितले आहे. तसेच पुढच्या वर्षी गणेशाचे आगमन कधी असणार या बाबतही त्यांनी माहिती दिली आहे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षानुवर्षापासून या उत्सवामुळे भक्तांच्या मनात आनंदाची आणि चैतन्याची भावना जागृत होते. गणेशाचे आगमन हे केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक आणि सामाजिक एकता जपण्याचे काम करते. गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटात होत असते. गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी कोणतेही कमी भासू नये यासाठी काही दिवस आधीपासूनच तयारी सुरू असते. यामध्ये मंडळात आणि घरगुती प्रतिष्ठापनेसाठी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी आरास, पुजेचे साहित्य, फळे, फुले, नैवेद्य यांचे नियोजन केले जाते. तसेच शास्त्रशुद्ध पद्धतीने गणेशाची स्थापना केली जाते. मात्र यंदा नेमका मुहूर्त काय असणार हे पंचांगकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

गणेशाच्या स्थापनेसाठी मुहूर्त

गणेशमूर्ती स्थापनेसाठी बुधवार, २७ ऑगस्ट रोजी मध्यान्हकाळी सकाळी ११.२५ ते दुपारी १.५४ या वेळेत प्राणप्रतिष्ठा आणि षोडशोपचार पूजन करण्याचा मुहूर्त असणार आहे. या वेळेत स्थापना शक्य नसल्यास सूर्योदयापासून दुपारी १.५४ पर्यंतही मूर्ती स्थापना करता येणार आहे, असे दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.

गौरी आवाहन केव्हा करावे ?

यंदा रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष्ठ गौरी घरी आणाव्यात, असे पंचांगकर्त्यांनी सांगितले. सोमवार, १ सप्टेंबर रोजी गौरींचे पूजन करावे. तर मंगळवार, २ सप्टेंबर रोजी रात्री ९.५० पर्यंत मूळ नक्षत्रावर विसर्जन करणे उत्तम ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढच्या वर्षी गणेशोत्सव कधी ?

गणेश विसर्जनावेळी नेहमीप्रमाणे “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा निनाद भक्तांकडून केला जातो. मात्र पुढील वर्षी (२०२६) ज्येष्ठ अधिकमास आल्याने गणेशोत्सवाचे आगमन उशिरा होणार आहे. त्यामुळे गणेशाचे आगमन सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून, यंदाच्या तुलनेत तब्बल १८ दिवस उशिरा गणेशोत्सव साजरा होणार आहे.