करोना महासाथीमुळे गेल्या दोन वर्ष बंद असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीच्या गणेश दर्शन स्पर्धा यावर्षी करोनाचे संकट टळल्याने कल्याण डोंबिवली पालिकेने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियानाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती आणि पर्यावरणस्नेही सजावट या दोन निकषांवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे, असे जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी सांगितले.पाच, सात आणि १० दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवांसाठी या स्पर्धा आहेत. या स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज वितरण करण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट संध्याकाळी चार वाजेपर्यंत आहे. प्रवेश अर्ज कल्याण येथील पालिका मुख्यालयात जनसंपर्क विभाग आणि पालिकेच्या १० प्रभाग क्षेत्र कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, असे जनसंपर्क अधिकारी पोफळे यांनी सांगितले.

हेही वाचा – उल्हासनगरात स्लॅब कोसळून मजूराचा मृत्यू ; गोल मैदान भागातील कोमल पार्क इमारतीतील घटना

गणेशमूर्तीसाठी स्थानिक मूर्तिकाराचा विचार करण्यात येणार आहे. सजावट पर्यावरणपूरक असण्याला प्राधान्य असणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पालिकेचे परीक्षक मंडळ २ सप्टेंबर पासून त्यानंतरच्या तीन दिवसाच्या कालावधीत संध्याकाळी, रात्री अचानक भेटी देणार आहेत. परीक्षकांचा निर्णय अंतिम असणार आहे. या पुरस्कारासाठी निवड करताना गणेश मूर्तीची उंची, सुबकता, मूर्ती तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले शाडू माती, पर्यावरणस्नेही वस्तू, माती यांचा विचार केला जाणार आहे. देखाव्यांसाठी स्त्रीभ्रृण हत्या, स्त्री शिक्षण, पर्यावरण संवर्धन, समतोल, पाणी बचत, स्मार्ट सिटी, कचरा व्यवस्थापन, निर्माल्य नियोजन, उत्सव काळात तयार होणाऱ्या कचऱ्याचे नियोजन, प्लास्टिक मुक्त पर्यावरण या विषयांना परीक्षक सर्वाधिक प्राधान्य देणार आहेत. यावेळी गणेश मंडळाचे वर्षभरातील कार्य, स्वच्छता अभियानातील सहभाग, सामाजिक कामे याचाही विचार केला जाणार आहे, असे पोफळे यांनी सांगितले.

हेही वाचा – डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावरील काटई चौकातील कोंडी सोडविण्यासाठी रस्ते कामाला सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशस्वी गणेशोत्सव मंडळांना गणेशमूर्तीसाठी प्रथम पुरस्कार १० हजार रुपये व स्मृतिचिन्ह, व्दितीय पुरस्कार सहा हजार व स्मृतिचिन्ह, तृतीय पुरस्कार चार हजार व स्मृतिचिन्ह. उत्तेजनार्थ दोन हजार रुपयाचे दोन पुरस्कार असणार आहेत.सजावटीसाठी प्रथम पुरस्कार १५ हजार व स्मृतिचिन्ह, व्दितीय १२ हजार व स्मृतिचिन्ह, तृतीय पुरस्कार १० हजार व स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ प्रत्येकी चार हजार रुपयांचे दोन पुरस्कार.