ठाणे : ठाणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. नवी मुंबई प्रणाणेच ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो. पण, त्यासाठी रावणाच्या अंहकाराचे दहन करावे लागले, असे विधान नाईक यांनी काही दिवसांपुर्वी केले होते. त्यास शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिउत्तर दिले होते. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असतानाच, गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमत्ताने त्यांच्या समर्थकांनी शिंदेच्या शिवसेनेचे गड असलेल्या ठाणे शहरात नाईकांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. त्यावरील मजकूरही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात संघर्ष वाढत चालला आहे. नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेत शिंदे गटाला डिवचले होते. नवी मुंबई महापालिकेतील प्रारूप प्रभाग रचनेवरून नाईक नाराज होते आणि त्यांच्या समर्थकांनी हजारो तक्रारी दाखल केल्या होत्या. यामुळे दोघांतील राजकीय तणाव अधिकच तीव्र झाला आहे. असे असतानाच, गणेश नाईक यांनी “नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो.
पण, त्यासाठी रावणाच्या अंहकाराचे दहन करावे लागले. त्यासाठी तुम्ही तयार आहात का”, अशी विचारणा करत गणेश नाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठाणे महापालिका निवडणूकीचे रणशिंग फुंकले होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात यूतीचा आग्रह धरला आणि या युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेल असेही नाईक यावेळी म्हणाले होते. त्यास शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिउत्तर दिले होते.
“रावण खलनायक का ठरला? कारण त्याने दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण केलं. नाईकांनी हे विधान एकनाथ शिंदे यांच्यासाठी अप्रत्यक्षपणे वापरले नसतील, त्यांनी हे विधान स्वतःबद्दलच केले असेल”, असा टोला म्हस्के यांनी लगावला होता. यावरूनच महायुतीमधील दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असतानाच, आता गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमत्ताने त्यांच्या समर्थकांनी शिंदेच्या शिवसेनेचे गड असलेल्या ठाणे शहरात नाईकांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत.
खमक जबाबदार नेतृत्व
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर तर, वनमंत्री गणेश नाईक यांचा १५ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. या दोन्ही नेत्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आलेले आहेत. एकाच फलकावरून दोन्ही नेत्यांनी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यावर “ विकास पुरूष, शब्दाला जागणार, दमदार खमक जबाबदार नेतृत्व, कार्यक्षम जनसेवक असा उल्लेख गणेश नाईक यांचा करण्यात आला आहे. शहरातील उड्डाण पुल, चौक, अशा सर्वच ठिकाणी हे फलक झळकताना दिसत आहेत.