Thane municipal corporation : ठाणे – कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जन करण्यासंदर्भात ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणेकरांनी पर्यावरणपूरक विसर्जन केले. त्यापाठोपाठ गणेशमूर्ती विसर्जनस्थळी घनकचरा व्यवस्थापन विभागाने राबवलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यंदा मोठ्याप्रमाणात निर्माल्य संकलन झाले असून त्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पटीने वाढ झाली आहे. या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. त्याचबरोबर दोन टनाहून अधिक प्लास्टिक जमा झाले आहे.
तलावांचे शहर ही ओळख टिकवण्यासाठी ठाणे महापालिकेकडून दरवर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जन संकल्पना राबविण्यात येते. यासाठी कृत्रिम तलाव, फिरते विसर्जन पथक, हौद, स्वीकृती केंद्र अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात येते. त्यास ठाणेकरांकडून दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. यंदाही हेच चित्र ठाणे शहरात दिसून आले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणाऱ्या ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विसर्जन स्थळांवर निर्माल्य संकलन करण्यात येत असते. त्यासाठी इथे पथके नेमण्यात येतात. यंदा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने राबवलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
सेंद्रिय खत निर्मिती
ठाणे महापालिकेच्या या उपक्रमामुळे जलस्रोतांमध्ये टाकले जाणारे निर्माल्य थेट खत निर्मितीसाठी वापरले जात आहे. या उपक्रमामुळे जलप्रदूषण टाळण्यास मदत होत असून, शाश्वत सेंद्रिय खत उत्पादनालाही चालना मिळत आहे. कोलशेत, कौसा आणि ऋतू पार्क येथील बायो-कंपोस्टिंग प्रकल्पांमध्ये हे संकलित निर्माल्य प्रक्रिया करून सेंद्रिय खतात रूपांतरित करण्यात येणार आहे. तसेच, निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत.
विसर्जनानुसार निर्माल्य संकलन
दिड दिवसाच्या मूर्ती विसर्जनानंतर १७ एवढे निर्माल्य जमा झाले. तर, पाचव्या दिवशी ८ एवढे निर्माल्य जमा झाले होते. सातव्या दिवशी १६ टन निर्माल्य जमा झाले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी (अखेरचा दिवस) ३२ टनांहून अधिक असे एकूण ७३ एवढे टन निर्माल्य जमा झाले. त्याचबरोबर दोन टनाहून अधिक प्लास्टिकही जमा झाले.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ
२०२४ साली गणेशोत्सवात एकूण ३२ टनांहून अधिक निर्माल्य संकलन झाले होते. त्यामध्ये दिड दिवशी १२ टन, सहाव्या दिवशी १३ टन आणि अनंत चतुर्दशी दिवशी ७ टन इतक्या निर्माल्याचा समावेश होता. यंदा त्यात दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका मागील १३ वर्षांपासून गणेशोत्सव काळात निर्माल्य व्यवस्थापन करत असून, यावर्षीचा उपक्रम अधिक व्यापक आणि प्रभावी ठरला आहे.