ठाणे : शहरातील वाहतूकीस अडथळा होऊ नये म्हणून रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करू नये असे आवाहन ठाणे महापालिकेकडून केले जात असतानाच, दुसरीकडे महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळेच पालिका मुख्यालय परिसरातील एका मंडळाला गणेशोत्सव हक्काचे मैदान सोडून रस्त्यावर साजरा करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. गणेशोत्सवासाठी राखीव असलेल्या भूखंडाचा भूमाफियांनी ताबा घेतला असून त्याचबरोबर अस्तित्वात नसलेल्या बांधकामावरही महापालिका कर आकारणी करीत असल्याचा आरोप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
ठाणे येथील पाचपाखाडी भागातील उदय नगरमधील काही तरुणांनी १९७९ मध्ये गणेशोत्सवाला सुरूवात केली. नरवीर तानाजी मित्र मंडळाच्या माध्यमातून हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या मंडळाने परिसरातील मोकळ्या भूखंडावर गणेशोत्सव सुरू केला होता. १९८६ मध्ये या मोकळ्या भूखंडावर स्वर्णा आणि सोमेश्वर या इमारतींची उभारणी करण्यात आली. परंतु या जागेवर साजरा होणारा गणेशोत्सव लक्षात घेऊन या इमारतींच्या विकासकांनी ३० फूट बाय ७० फूट जागा केवळ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोकळी सोडली होती. त्यामध्ये स्वर्गीय नातू परांजपे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. १९८७ मध्ये काही भूमाफियांकडून दादागिरी करून या जागेवर अतिक्रमण करण्यात आले. या भूखंडावर भूमाफियांकडून चाळींचे बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात आले. गणेशोत्सवासाठी राखीव असलेल्या भूखंडावर हे बेकायदा बांधकाम करण्यात आले. त्यानंतर भूमाफियांने अधिकच्या लाभासाठी २००८ मध्ये अनधिकृत इमारत बांधण्याचाही प्रयत्न केला. त्याविरोधात वारंवार तक्रारी करण्यात आल्यानंतर पालिकेने चारवेळा दिखाऊ कारवाई केल्याचा आरोप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या कारवाईनंतर भूखंडावर बांधकाम असल्याच्या बोगस नोंदी कायम ठेवून कर आकारणी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या भूखंडावर २०१८ मध्ये बेकायदेशीरपणे अवाढव्य असे सर्व्हीस स्टेशन उभारण्यात आले होते. त्यावेळी करण्यात आलेल्या तक्रारींनतर कारवाई करण्यात आली होती. मात्र, पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा नव्याने सर्व्हीस स्टेशन आणि चहाची टपरी बेकायदेशीरपणे उभारण्यात आली आहे. हे अतिक्रमण हटवून या मोकळ्या भूखंडावर डांबरीकरण करून तो भूखंड गणेशोत्सवाव्यतिरिक्तच्या काळात पार्किंगसाठी देण्यात यावा, अशी येथील स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
गणेशोत्सवासाठी राखीव असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी अतिक्रमण केल्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करावा लागत आहे. या भुखंडावरील अतिक्रमण हटवून पालिकेने तो भुखंड मोकळा करावा अशी आमची मागणी आहे.
संदीप पवार, अध्यक्ष, नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पाचपखाडी
या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.
जी. जी. गोदेपुरे उपायुक्त, ठाणे महापालिका