अंबरनाथ : पर्यावरणासाठी हाणीकारक असलेल्या पीओपी मातीच्या गणेश मूर्तींच्या विघटनाचा प्रश्न अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मार्गी लागला आहे. येथील रोटरी क्लबच्या मदतीने पीओपी मूर्ती विघटनासाठी विशेष द्रावण तयार केले असून त्यात मूर्ती विसर्जीत केल्यानंतर काही तासात तिचे विघटन होत आहे. त्यामुळे पीओपी मूर्तींमुळे नैसर्गिक जलस्त्रोतात आणि कृत्रिम कुंडातही होणारे प्रदुषण रोखले जाणार आहे. अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून रोटरी क्लबने हा उपक्रम सुरू केला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर भर दिला जात आहे. घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांमधून शाडू मातीच्या मूर्तींना अधिक मागणी दिसत असली तरी काही भाविक अजूनही पीओपीपासून तयार झालेल्या मूर्तींची निवड करतात. मात्र, अशा मूर्ती पाण्यात सहज न विरघळल्याने त्यांची विटंबना होण्याचे प्रकार घडतात आणि जलप्रदूषणाची समस्या वाढते. यावर अंबरनाथ आणि बदलापूर शहरात तोडगा काढला असून पीओपी गणेश मूर्तींचे विघटन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

रोटरी क्लबने अंबरनाथ नगरपालिका, कुळगाव बदलापूर नगरपालिका, पेण नगरपालिका आणि लोणावळा नगरपालिकेसोबत संयुक्त विद्यमाने निसर्गप्रेमी राजेश भवसार यांनी हा अभिनव उपक्रम राबविला आहे. पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेटच्या द्रावणाने युक्त ‘अमृत जल तलाव’ तयार करण्यात आले आहेत. या द्रावणात मूर्ती केवळ ७२ ते ९० तासांत पूर्णपणे विरघळते. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रयोगाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, यावर्षी अंबरनाथ शहरात सहा, बदलापुरात चार, पेण आणि लोणावळा येथे प्रत्येकी एक कृत्रिम कुंड तयार करण्यात आले आहे.

पालिका प्रशासनाच्या सहकार्याने ग्रीनसिटी, कानसई, मोरीवली पूर्व-पश्चिम, कैलासनगर खदान, हरिओम पार्क आणि शिवगंगा नगर परिसरात हे विशेष तलाव तयार करण्यात आले. या प्रक्रियेसाठी पाणी आणि सुमारे १ टन अमोनियम बायकार्बोनेटचे मिश्रण नगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव, सचिव आनंद राघवन यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ सह १० रोटरी क्लब सोबत प्रकल्पप्रमुख राजेश भावसार यांनी हा प्रकल्प यशस्वी केला.

अमोनियम बायकार्बोनेटमुळे मूर्ती सहज विघटन होऊन जलप्रदूषण टाळले जाते. तसेच मूर्तीची विटंबना होण्याची शक्यता कमी होते. नागरिकांनी इच्छिल्यास गणेशमूर्तीबरोबर तिच्या अर्ध्या वजनाएवढे अमोनियम बायकार्बोनेट घरी नेऊन घरच्या घरी विसर्जनही करू शकतात. या प्रक्रियेतून मूर्ती विरघळल्यानंतर अमोनियम सल्फेट तयार होते, जे सेंद्रिय खत म्हणून उपयोगी पडते, तर उरलेला कॅल्शियम कार्बोनेट खडू बनवण्यासाठी वापरला जातो. – राजेश भावसार, प्रकल्प प्रमुख, रोटरी क्लब.