ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा समस्या महिनाभरापुर्वी सुटल्याचे चित्र असतानाच, या समस्येने गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. शहरातील विविध भागातील रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे. पावसामुळे हा कचरा सडून दुर्गंधी पसरण्याबरोबरच आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे.
ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसर पालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र आहे. या केंद्रावर कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच येथे दोनदा आग लागल्याने परिसरात सर्वत्र धूर पसरून नागरिकांना त्रास झाला. यामुळे स्थानिक नागरिकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षाने येथे कचरा आणण्यास विरोध केला. या विरोधानंतर ठाणे महापालिकेने शहरातील कचरा भिवंडी येथील आतकोली भागातील कचराभुमीवर नेण्यास सुरूवात केली आहे.
तसेच सीपी तलाव येथे साठलेला कचराही हटविला होता. यामुळे पालिकेचे कचऱ्याचे दैनंदिन चक्र बिघडल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले होते. यावरून पालिकेवर टिकाही झाली होती. पालिकेने प्रभाग निहाय कचरा हस्तांतरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यास विरोध झाल्यानंतर पालिकेने शंभर किलो कचरा निर्माण करणारी संकुले आणि आस्थापनांना नोटीसा बजावून स्वताच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारण्याची सुचना केली होती. त्याचबरोबर शहरात निर्माण झालेली कचरा समस्या सोडविण्यात पालिकेला काहीसे यश आले होते.
परंतु महि्नाभरानंतर शहरात आता पुन्हा कचरा समस्येने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. शहरातील रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यात येत असून हा कचरा गेल्या दोन दिवसांपासून उचलण्यात आलेला नाही. त्यातच पाऊस सुरू झाल्याने हा कचरा सडून दुर्गंधी पसरण्याबरोबरच आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे.
कोंडीचा कचरा वाहतूकीला फटका ठाणे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच पाऊस सुरू झाल्याने कोंडीत भर पडत आहे. या कोंडीत घंटागाडी अडकून पडत असल्याने कचऱ्याचे वेळापत्रक कोलमडत असून त्यामुळे ही समस्या काही ठिकाणी निर्माण झाली आहे. मात्र, काही ठिकाणी साठलेला कचरा तातडीने उचलण्याचे नियोजन करण्यात येत आहे. – प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका