Navi Mumbai Airport / ठाणे : देशातील बहुप्रतिक्षित अशा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली आहे. उद्योजक गौतम अदानी यांनीच याबाबतची माहिती त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिली आहे. तसेच त्यांनी एक भावनिक पोस्ट देखील त्यामध्ये लिहीली आहे. अदानी यांच्या घोषणेनंतर विमानतळाच्या उद्घाटनाटी तारीख ठरली असली तरी नामकरणाचा सस्पेंस अद्यापही कायम आहे.

नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारले जात आहे. हा प्रकल्प १,१६० हेक्टर क्षेत्र व्यापतो आणि पाच टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२५ अखेर पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असून त्याद्वारे दरवर्षी सुमारे २० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे तसेच प्रकल्प २०३८ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ९० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याचे सरकारचे नियोजन आहे.

विमानतळ प्रकल्पाचे महत्व विचारात घेता विमानतळाच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील स्थानिक क्षेत्रातील विकासाचे आणि पायाभूत सुविधांचे धोरणात्मक नियोजन केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यास ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली इत्यादी भागातील प्रवाशांना त्याचा मोठा दिसाला मिळणार आहे. त्यासाठी महानगर प्रदेश क्षेत्रातील विविध भागांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले जाणार आहे.

नामकरणावरून वाद

DB Patil Naming : विमानतळाला माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे अशी मागणी भूमिपूत्रांची आहे. त्यासाठी येथे आंदोलनही झाले. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी त्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी देखील केली आहे. त्यामुळे या विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अदानींची पाहणी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहाणी नुकतीच अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी केली. त्यांच्या सोबत इतर काही अधिकारी होते. अदानी विमानातून विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले. त्यावेळी त्यांनी विमानतळाच्या कामाचा आढावा घेतल्याचे कळते आहे. यापूर्वी देखील मार्च महिन्यात गौतम अदानी यांनी विमानतळाची पाहाणी केली होती.

काय म्हणाले अदानी

उद्योगपती गौतम अदानी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी म्हटले की, ८ ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटना पूर्वी, मी मा‍झ्या सहकारी अपंग, बांधकाम कामगार, महिला कर्मचारी, अभियंते, कारागीर, अग्निशमन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना भेटलो. ज्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास मदत केली.

हजारो हातांनी आणि हृदयांनी या मूर्त रुप दिले. लाखो उड्डाणे आकाशात जात असताना आणि कोट्यवधी लोक या कॉरिडॉरमधून जात असताना, त्यांचा उत्साह प्रत्येक उड्डाणात आणि प्रत्येक पावलावर प्रति ध्वनित होईल. आणि मी त्यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.