गेल्या दोन दिवसांपासून घोडबंदर भागात मध्यरात्रीच्या वेळेत विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे दिवसा बाहेर पडलेल्या नागरिकांना उन्हाच्या झळा सोसल्यानंतर रात्रीच्या उकाड्याचा फटका सहन करावा लागत आहे. मध्यरात्री विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांची झोप मोड होत असून महावितरणच्या कारभारावर येथील नागरिकांकडून टिका केली जात आहे.
गेल्याकाही दिवसांपासून शहरातील तापमान वाढू लागल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. रात्रीच्या वेळेतही प्रचंड उकाडा होत असल्याने अंगाची लाही-लाही होऊ लागली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून घोडबंदर येथील येथील कोलशेत, विजयनगरी, वाघबीळ या भागात मध्यरात्रीच्या वेळेत विद्युत पुरवठा खंडीत होऊ लागला आहे.
सोमवारी कोलशेत, विजय नगरी, भागात रात्री ११ वाजेच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे उद्वाहकही बंद होते. रात्रीच्या वेळेत उशिराने कामावरून येणाऱ्या अनेकांना यामुळे इमारतीचे जिने पायी चढून जाण्याची वेळ आली होती. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने अनेकांची झोपमोड झाली होती. मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास हा विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत झाला होता. बुधवारी रात्री ही येथील काही भागात तांत्रिक बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. सुमारे दोन ते तीन तासांनी हा विद्युत पुरवठा सुरळीत झाला. अशी माहिती येथील काही रहिवाशांनी दिली.