ghodbunder road traffic jam : ठाणे : गेल्याकाही महिन्यांपासून ठाण्यात भीषण वाहतुक कोंडी आणि खड्डे समस्या निर्माण झाली आहे. वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करुनही रस्त्यावर खड्डे पडत असल्याने अखेर संतप्त झालेल्या घोडबंदर भागातील नागरिकांनी आज, शुक्रवारी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी सकाळी घोडबंदर येथील आनंद नगर परिसरातील पदपथावर येथील नागरिक एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहेत.
गेल्याकाही महिन्यांपासून घोडबंदर मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. घोडबंदर मार्गावर वारंवार दुरुस्ती करुनही येथील वाहतुक कोंडी सोडविण्यात प्रशासनाला यश मिळाले नाही. येथील गायमुख घाट रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे दररोज वाहन चालकांना कोंडी सहन करावी लागते. घोडबंदर हा मार्ग उरण जेएनपीए बंदरातून वाहतुक करणाऱ्या आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहन चालकांसाठी महत्त्वाचा आहे. तसेच मिरा भाईंदर, वसई, विरार, पालघर भागातून ठाणे, नवी मुंबईत कामानिमित्ताने वाहतुक करणाऱ्या नोकरदारांसाठीही हा रस्ता महत्त्वाचा आहे.
वाहतुक कोंडीमुळे नोकरदार हैराण
घोडबंदर घाट रस्त्यावरुन अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होत असते. घोडबंदर घाट भागात पडलेले खड्डे आणि विरुद्ध दिशेने सुरु असलेली वाहतुक याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो. दररोज गायमुख घाट परिसरात होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे ठाण्याहून वसई, विरार, गुजरात, मिरा भाईंदरच्या दिशेने वाहतुक करताना आणि तेथून या ठाणे, नवी मुंबईत जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्याचा फटका बसत असतो. या वाहतुक कोंडीत अवजड वाहने देखील अडकत असतात. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. सकाळी हजारो नोकरदारांकडून या मार्गाचा वापर होतो. वाहतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही.
नागरिकांचे आंदोलन
वाहतुक कोंडीविषयी अनेक तक्रारी करुनही प्रशासनाकडून येथील कोंडी आणि खड्ड्यांची समस्या सोडविली जात नाही. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी आज, शुक्रवारी सकाळी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. येथील नोकरदार, रहिवाशांनी एकत्र येऊन ‘जस्टीस फाॅर घोडबंदर रोड’ ही संस्था सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. घोडबंदर येथील आनंद नगर चौकात वाहतुक पोलिसांची पोलीस चौकी आहे. या चौकीजवळील पदपथावर एकत्र उभे राहून फलक हातात घेऊन हे आंदोलन केले जाणार आहे. शांततेचे हे आंदोलन होणार असून या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन जस्टीस फाॅर घोडबंदर रोडच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.