ठाणे : घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मिरा भाईंदर महापालिकेकडून सुरु आहे. या दुरुस्ती दरम्यान अवजड वाहनांना घोडबंदर भागात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. हे वाहतुक बदल रविवारी सकाळी ११ वाजेपासून सुरु झाले असून १४ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील. या वाहतुक बदलामुळे मुंबई नाशिक महामार्ग, भिवंडी- कशेळी भागातील वाहतुक व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे.

मुंबई,ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना वाय जंक्शन आणि कापूरबावडी येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने नाशिक मार्गे खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे किंवा कापूरबावडी, कशेळी येथून वाहतुक करतील.

मुंब्रा बाह्यवळण, कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खारेगाव खाडी पूल, मानकोली, अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील. नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मानकोली पूलाखालून वळण घेत अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील.

तसेच, गुजरात येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गायमुख नाका येथे सकाळी ६ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत प्रवेशबंदी असेल. येथील वाहने चिंचोटी नाका येथून कामण, अंजुर फाटा, मानकोली, भिवंडी मार्गे वाहतुक करतील. हे सर्व वाहतुक बदल रविवारी सकाळी ११ वाजेपासून सुरु झाले असून १४ ऑक्टोबर रात्री १२ पर्यंत कायम असतील.