Ghodbunder Road Traffic Jam: मुंबई, नवी मुंबई, भिवंडी आणि गुजरात राज्यातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून या कोंडीमुळे बेजार झालेले घोडबंदरवासिय आता थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. अशाचप्रकारे शनिवारी सकाळी काही नागरिकांनी घोडंबदर मार्गावरील आनंदनगर नाक्यावर आंदोलन करत वाहनचालकांना पोस्टर देऊन या समस्येविरोधात लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. या पोस्टरद्वारे घोडबंदरनीडॲक्शन (#GhodbunderNeedsAction) या हॅशटॅगखाली नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत होते. तसेच “आम्ही कर भरतो, आम्हाला खड्डेमुक्त आणि कोंडीमुक्त रस्ते द्या” अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्पाच्या कामामुले रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच आता मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचे काम सुरू आहे. या कामास नागरिकांचा विरोध आहे. तरीही हे काम सुरू असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सुर उमटत आहे. या प्रकल्पांच्या कामामुळे रस्ते अरुंद झाल्याने त्यात पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे घोडबंदर मार्गावर वारंवार वाहतुक कोंडी होत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. यावर काहीतरी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. घोडबंदर घाट रस्त्यावरुन अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होत असते. घोडबंदर घाट भागात पडलेले खड्डे आणि विरुद्ध दिशेने सुरु असलेली वाहतुक याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो. दररोज गायमुख घाट परिसरात होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे ठाण्याहून वसई, विरार, गुजरात, मिरा भाईंदरच्या दिशेने वाहतुक करताना आणि तेथून या ठाणे, नवी मुंबईत जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्याचा फटका बसत असतो. वाहतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही.
घोडबंदर नीड ॲक्शन मोहिम
रस्त्यांच्या बिकट अवस्था आणि सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीविरोधात घोडबंदर परिसरातील नागरिकांनी आवाज उठविण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपुर्वी नागलाबंदर भागात नागरिकांनी एकत्र जमून आंदोलन केले होते. आंदोलकांनी काहीवेळासाठी रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यापाठोपाठ शनिवारी सामाजिक कार्यकर्ते अजय जया, पुनित सिंग आणि त्यांच्यासह इतर नागरिकांनी एकत्रित येऊन आनंदनगर भागात आंदोलन करत वाहनचालकांना पोस्टर देऊन या समस्येविरोधात लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. या पोस्टरद्वारे घोडबंदरनीडॲक्शन (#GhodbunderNeedsAction) या हॅशटॅगखाली नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत होते. पुढील काही दिवस नागरिकांमध्ये अशाचप्रकारे जनजागृती करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
खड्डेमुक्त आणि कोंडीमुक्त रस्ते द्या
“आम्ही कर भरतो, आम्हाला खड्डेमुक्त आणि कोंडीमुक्त रस्ते द्या” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. दररोजच्या वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते आणि नियोजनाअभावी होणारी त्रासदायक स्थिती यामुळे रहिवासी वैतागले आहेत. “आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतो, आता अधिकारी मंडळींनीही आपले कर्तव्य पार पाडावे!” असा स्पष्ट इशारा पोस्टमधून आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने पावले उचलून रस्ते दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थापनाबाबत ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिकांचा संताप आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.