ठाणे : ठाणे शहरातील घोडबंदर रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. या मार्गावरील खड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून त्याचा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. या खड्यांच्या मुद्यांवरून संबंधित विभागावर टिका होत असतानाच मनसे नेते अविनाश जाधव यांनी गुरूवारी गायमुख घाट परिसरात जाऊन रस्त्यावरील खड्यांचा आकार मोजला. उपमुख्यमंत्री, परिवहनमंत्री, वनमंत्री असे तीन मंत्री ठाण्यातलेच आहेत. तरीही घोडबंदर रस्त्याची ही अवस्था का? असा संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच या सर्वमंत्र्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी गुरूवारी घोडबंदर रस्त्यावर पाहणी दौरा केला. यावेळी घोडबंदर परिसरातील अनेक समस्यांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान ते म्हणाले की, घोडबंदर रस्त्याला एक मायबाप नाही. अवघ्या १०-१२ किमीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका, वन विभाग अशा अनेक विभागांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे कामाची जबाबदारी कुणावर आहे, हेच स्पष्ट नाही.
परिणामी, नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. तसेच राजकीय नेते नेहमी म्हणतात की हजारो कोटींचा निधी आणला, पण रस्ते पाहता ते काहीच दिसत नाहीत. केवळ आकड्यांची गोष्ट करून ठाणेकरांची फसवणूक होत आहे, असेही जाधव म्हणाले. यावेळी जाधव यांनी वनविभागावरही रोष व्यक्त केला. २५ फूट जागा रस्त्यासाठी हवी आहे, ती दिल्यास रस्ता रुंद होईल. मात्र, वनविभाग परवानगी देत नाही.
अनधिकृत झोपडपट्ट्या आणि हॉटेलांना मात्र परवानग्या मिळतात. हा कोणता नियम आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर वनविभाग मुख्य रस्त्यासाठी परवानगी देत नसेल, तर आम्हीही अनधिकृतपणे अतिक्रमण करूनच रस्ता उभारायचा का? असा सवाल जाधव यांनी थेट सरकारला विचारला. ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्या फाईल्स नाशिक, दिल्लीपर्यंत फिरतात आणि जे अनधिकृत आहेत त्यांना संरक्षण दिले जाते असे जाधव म्हणाले.
त्याचबरोबर रस्त्याचे टेंडर निघाले की, आधी १० टक्के नेत्यांचे काढावे लागतात. असे सर्व अधिकाऱ्यांचे काढले तर २५ टक्के वाटण्यातच जातात. मग उरलेल्या पैशात ठेकेदार काय दर्जा देणार? असे ते म्हणाले. तसेच ठेकेदारांनी आत्माहत्या करण्याऐवजी कोणाला किती पैसे दिलेत याची यादी जाहीर करा असे देखील ते म्हणाले.