ठाणे : मुंबई महानगरातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील घोडबंदर मार्गावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यातच पावसाळ्यात या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. यावरून टिका होऊ लागताच संबंधित प्रशासनाने खड्डे भरणी केली पण, गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसानंतर या मार्गावर पुन्हा खड्डे दिसू लागले आहेत. या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आता समाजमाध्यांवर विनोद होऊ लागले आहेत.

मुंबई, नवी मुंबई, पालघर, भिवंडी आणि गुजरात या भागातील वाहतूकीसाठी घोडबंदर हा महत्वाचा मार्ग मानला जातो. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. याशिवाय, या मार्गालगत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती उभ्या राहिल्या आहेत. या वसाहतींमधील नागरिकही घोडबंदर मार्गावरून दररोज कामानिमित्त प्रवास करतात. यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावर मेट्रो प्रकल्पाबरोबच मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीची कामे सुरू आहेत. या कामामुळे अनेक ठिकाणी मार्गिका अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर खड्डे पडत असल्याने वाहनांचा वेग मंदावून कोंडी होते. यंदाही हेच चित्र कायम आहे.

नागरिकांची आंदोलने

सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे रहिवाशी हैराण झाले आहेत. या कोंडीविरोधात नागरिक आता रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. काही दिवसांपुर्वी नागरिकांनी आंदोलन करत आम्ही कर भरतो आम्हाला खड्डे आणि कोंडीमुक्त रस्ते द्या अशी मागणी केली होती. नागरिकांना एकत्रित करण्यासाठी काही नागरिकांनी जनजागृती मोहीम सुरू केली असून त्यासाठी गृहसंकुलांमध्ये जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. यामुळे खड्डेमुक्त रस्ते आणि कोंडीमुक्त रस्ते झाले नाही तर जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कर्णाच्या रथाचे चाक खड्ड्यात रुतले

घोडबंदरच्या वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्ड्यांविषयी नागरिकांकडून आंदोलन करण्यात येत आहेत. समाज माध्यमांद्वारे प्रशासनावर टिका करण्यात येत आहे. काही वेळेस संतापही व्यक्त करण्यात येत आहे. तरीही समस्या कमी होत नसल्यामुळे नागरिकांनी आता उपरोधित टिका करण्यास सुरूवात केली असून त्याचा एक भाग म्हणून खड्ड्यांवरून विनोदाचे संदेश प्रसारित केले जात आहे. असाच एक संदेश आता सर्वांचे लक्ष वेधत आहेत. यामध्ये “ हेच ते ठिकाण ‘ठाण्यातील घोडबंदर रोड’ जिथे कर्णाच्या रथाचे चाक खड्ड्यात रुतले होते..”, असा मजकूर आणि त्यासोबत कर्ण खड्ड्यात अडकलेले चाक काढतानाचे चित्र आहे. या विनोदाद्वारे प्रशासनाची खिल्ली उडवली जात आहे.