Thane News : ठाणे : घोडबंदर मार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या मार्गावरील गायमुख घाटात गेल्याकाही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात खड्डे पडले होते. मागील आठवड्यापासून वाहन चालकांना दररोज या मार्गावर कोंडीचा सामना सहन करावा लागत होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या बद्दल नाराजी व्यक्त करुन रस्ते दुरुस्तीचे आदेश दिले होते. अखेर मंगळवारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यानंतर आता हा रस्ता दुरुस्त करण्याचे काम ८ ऑगस्टपासून केले जाणार आहे. यासाठी ठाणे पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत. जाणून घेऊया कसे आहेत वाहतुक बदल.

घोडबंदर मार्ग हा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी दळणवळणाचा मार्ग आहे. गुजरात व वसई परिसरातून उरणमधील जेएनपीए बंदर किंवा भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणारी अवजड वाहतूक प्रामुख्याने याच मार्गावरून वाहतुक करतात. यासोबतच, वसई-विरार आणि मिरा-भाईंदर परिसरातील हजारो नोकरदार नागरिक नवी मुंबई व ठाणे येथे नोकरीनिमित्त दररोज प्रवास करतात. तर ठाण्याहून बोरीवली, वसई मिरा भाईंदर भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांकडूनही याच मार्गाचा वापर होतो. गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर घाट मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा परिणाम आता वाहतुक व्यवस्थेवर दिसून येतो.

या वाहतुक कोंडीवरुन आणि खड्ड्यांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट उपस्थित होते. या बैठकीत कोंडीच्या समस्येवरून शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत गायमुख घाटाची पाहणी केली. तसेच रस्ते दुरुस्तीच्या सुचना केल्या. त्यानुसार आता ८ ऑगस्टपासून डांबरीकरण आणि रस्त्याच्या दुरुस्ती कामास सुरुवात होणार आहे.

असे आहेत वाहतुक बदल

  • मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना कापूरबावडी उड्डाणपूलावरील वाय जंक्शन येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खारेगाव टोलनाका मार्गे मानकोली, अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील, किंवा कापूरबावडी जंक्शन येथून कशेळी-काल्हेर मार्गे अंजुरफाटा येथून वाहतुक करतील.
  • मुंब्रा बाह्यवळण येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खारेगाव टोलनाका येथून मानकोली, अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील.
  • नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना मानकोली येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने मानकोली पूलाखालून अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील.
  • गुजरात येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने चिंचोटी नाका, कामण, अंजुरफाटा, मानकोली मार्गे वाहतुक करतील.

वाहतुक बदल कधी पर्यंत

  • हे वाहतुक बदल केवळ अवजड वाहनांसाठी लागू असतील. ८ ऑगस्ट रात्री १२ ते ११ ऑगस्ट पहाटे ५ वाजेपर्यंत हे वाहतुक बदल लागू असतील असे ठाणे पोलिसांनी काढलेल्या अधिसूचनेत नमुद करण्यात आले आहे.