Thane Traffic : ठाणे : घोडबंदर मार्गावर बुधवारी मध्यरात्रीपासून ठाणेकरांना भीषण वाहतुक कोंडीचा फटका सहन करावा लागत आहे. सकाळी ८.३० नंतरही येथील वाहतुक कोंडी सुटलेली नाही. घोडबंदर घाट परिसरातील खड्डे, विरुद्ध दिशेने सुरु असलेली वाहतुक यामुळे वाहतुक कोंडी झाली आहे. या कोंडीमुळे ठाण्याहून मिरा भाईंदर, वसई, बोरीवली, दहीसरच्या दिशेने आणि तेथून ठाण्यात येणाऱ्या नोकरदारांना मोठ्या कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे.

मिरा भाईंदर येथील नवघर ते ठाण्यातील मानपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. ठाणे आणि मिरा भाईंदर पोलिसांकडून वाहतुक सोडविण्याचे कार्य सुरु होते.

गेल्याकाही महिन्यांपासून घोडबंदर मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. घोडबंदर मार्गावर वारंवार दुरुस्ती करुनही येथील वाहतुक कोंडी सोडविण्यात प्रशासनाला यश मिळाले नाही. येथील गायमुख घाट रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे दररोज वाहन चालकांना कोंडी सहन करावी लागते. घोडबंदर हा मार्ग उरण जेएनपीए बंदरातून वाहतुक करणाऱ्या आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहन चालकांसाठी महत्त्वाचा आहे. तसेच मिरा भाईंदर, वसई, विरार, पालघर भागातून ठाणे, नवी मुंबईत कामानिमित्ताने वाहतुक करणाऱ्या नोकरदारांसाठीही हा रस्ता महत्त्वाचा आहे.

वाहतुक कोंडीमुळे नोकरदार हैराण

घोडबंदर घाट रस्त्यावरुन अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होत असते. घोडबंदर घाट भागात पडलेले खड्डे आणि विरुद्ध दिशेने सुरु असलेली वाहतुक याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला. मिरा भाईंदर येथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गावर नवघर ते गायमुख घाट पर्यंत वाहतुक कोंडी झाली आहे. तर ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर घोडबंदर घाट ते मानपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मध्यरात्रीपासून ही वाहतुक कोंडी सुरू आहे. या वाहतुक कोंडीत अवजड वाहने देखील अडकली आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. सकाळी हजारो नोकरदारांकडून या मार्गाचा वापर होतो. वाहतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.

वाहनांच्या रांगा

घोडबंदर मार्गावर वाहनांच्या रांगा दिसत आहेत. वाहतुक कोंडीबाबत काशिमीरा पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. परंतु कोंडी अधिक असल्याने ते सुटली नाही. ही वाहतुक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले.