लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली पूर्व भागातील दावडी परिसरात एका सहा वर्षाच्या बालिकेचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. दर्शना फॉर्म या इमारतीच्या जिन्याच्या बाजूला संरक्षित जाळ्या नसल्याने हा अपघात घडला. मृत बालिकेच्या वडिलांनी विकासकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.

परी छोटूलाल बिंद (६) असे मृत बालिकेचे नाव आहे. तिचे वडील छोटूलाल बिंद हे नालासोपारा येथे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. सोमवारी आपल्या नातेवाईकांकडे पूजा असल्याने छोटूलाल आपल्या पत्नी आणि मुलीला घेऊन डोंबिवलीतील आले होते. पूजा सुरू असताना परी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील जिन्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत खेळत होती. जिन्याच्या बाजूला असलेल्या भिंतीला संरक्षित लोखंडी जाळी नसल्यामुळे परीचा तोल जाऊन ती थेट जमिनीवर कोसळली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भीषण अपघातात परीचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच रहिवासी इमारतीच्या तळमजल्याला आले. परीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या अपघातानंतर परीच्या वडिलांनी इमारतीच्या विकासकाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

“इमारतीच्या भिंतीला संरक्षित जाळी नसल्याने माझ्या मुलीचा जीव गेला आहे. विकासकाच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे विकासकावर गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी छोटूलाल बिंद यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलीस करत आहेत.